आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंत:महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’चे राजकारण्यांकडून मोफत शो, केदार शिंदे म्हणाले - 'नेत्यांना शाहीर साबळे कोण, हे तरी माहिती असेल का?'

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर त्यांची लेक सना शिंदे हिने या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे हिंदीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. वादग्रस्त विषयावर बेतलेल्या या चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रात या चित्रपटाचे राजकारण्यांकडून मोफत शो आयोजित केले जात आहेत. आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य करताना एक खंत व्यक्त केली आहे.

ट्वीट शेअर करत बोलून दाखवली मनातील खंत
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत असे केदार शिंदे यांचे म्हणणे आहे आणि याबद्दलच त्यांनी खंत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. केदार शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "दुर्दैव… महाराष्ट्रात 'केरला स्टोरी' या चित्रपटाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?" असे ते म्हणाले आहेत.

केदार शिंदे यांच्या ट्वीटवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी हे दोन्ही चित्रपट टॅक्स फ्री करावेत अशी मागणी केली आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 35.75 कोटींची कमाई केली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अजय-अतुल यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटामधील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.