आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदार शिंदेच्या मुलीचे सिनेसृष्टीत पदार्पण:'महाराष्ट्र शाहीर'मध्ये साकारतेय खास भूमिका, वडील केदार म्हणाले...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांचे नातू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर साबळे यांच्या जीवनावर चित्रपट करत आहेत. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेविषयी आज केदार शिंदे यांनी पोस्ट केली आहे.

शाहीरांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात भक्कम साथ असणाऱ्या त्यांच्या पत्नी 'भानुमती कृष्णकांत साबळे' यांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत याचा उलगडा केला आहे. या चित्रपटातून केदार यांची लेक आणि शाहीर साबळे यांची पणती सना शिंदे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. चित्रपटात सना भानुमती कृष्णकांत साबळे यांची भूमिका वठवणार आहे.

चित्रपटातील सनाच्या लूकचा फोटो शेअर करत केदार शिंदे यांनी लिहिले, "आज 3 सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं.... सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती."

यापूर्वीच्या पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणाले होते, "आपल्या मुलांनी आपल्याकडे पाहून स्वत:चा मार्ग निवडावा, हीच तर इच्छा असते... लवकरच" असे म्हणत सना सिनेसृष्टीत पाऊल ठेवत असल्याची हिंट दिली होती. यापूर्वी सनाने केदार यांना चित्रपटांमध्ये असिस्ट केले होते.

महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असून अजय-अतुलचे सुमधुर संगीत चित्रपटाला असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...