आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाउंसमेंट ऑफ द डे:केदार शिंदेंच्या आगामी 'बाईपण भारी देवा'चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी येतोय हा चित्रपट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा "बाईपण भारी देवा" प्रदर्शित होणार 6 जानेवारी 2023 ला...

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे तब्बल तीन वर्षांच्या गॅपनंतर एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे आज गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. पुढील वर्षी 6 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

केदार शिंदे यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिले, आता करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी…आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे, असे म्हटले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला हा चित्रपट येत्या नव वर्षात, ६ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती MVB Media च्या माधुरी भोसले यांनी केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सह-निर्माते आहेत. 'घे डबल' आणि 'गोदावरी' या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजचा हा सलग तिसरा चित्रपट आहे.

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अशा सहा उत्तम कलाकारांची धमाल आपल्याला बघायला मिळणार आहे.

काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि त्याचबरोबर कौटुंबिक, वैयक्तिक तसंच आर्थिक समस्या अशा गोष्टींचा सामना करणाऱ्या सहा बहिणींची ही कथा आहे.

चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “आपल्या सर्वांच्या दररोजच्या आयुष्यात अशा स्त्रिया आहेत ज्या अशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, परंतु आपणच कळत नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. ‘बाईपण भारी देवा' हा चित्रपट अशाच महिलांना समर्पित आहे. या सहा बहिणींची ही गोष्ट सर्वांना नक्कीच आवडेल. आणि नवीन वर्षाची सुरुवात एका आशादायी आणि आनंदाने होईल याची मला खात्री आहे.”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' येत्या नव वर्षात 6 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...