आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती रेडकरचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण:ओटीटी प्लॅटफॉर्मवर घेऊन येतेय पहिलावहिला मराठी रिअ‍ॅलिटी शो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे 'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच 'प्लॅनेट मराठी' आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था 'दॅट हॅप्पी गर्ल' एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत क्रांती रेडकर
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत क्रांती रेडकर

वर्षपूर्तीनिमित्त मनोरंजक वेब फिल्म, वेब सिरीजच्या घोषणा होत असतानाच प्लॅनेट मराठीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रिॲलिटी शोची. मराठी ओटीटीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. या शोची रूपरेखा नेमकी काय असणार, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे.

या शोबाबत निर्माती क्रांती रेडकर म्हणते, "पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करताना मला एका चांगल्या ओटीटीसोबत काम करायचे होते. प्लॅनेट मराठी सोबत मी 'रेनबो' चित्रपट केला असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम आहे. त्यामुळे 'प्लॅनेट मराठी' हाच मला योग्य पर्याय वाटला. मुळात 'प्लॅनेट मराठी' हे खूपच दूरदर्शी आहे. प्रेक्षकांची आवड ते उत्तम जाणतात. या शोच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी'सोबत सुरु झालेला माझा हा नवीन प्रवास नक्कीच अविस्मरणीय असणार. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून आम्ही अवघ्या महाराष्ट्रात पोहोचणार आहोत. यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.''

बातम्या आणखी आहेत...