आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे आपला शोक व्यक्त केला आहे. लतादीदींच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नाही, असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.
आपल्या भावना व्यक्त करताना अण्णा हजारे म्हणाले, 'लता दीदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादीदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणा-या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणा-या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादीदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.'
पुढे ते सांगतात, 'लतादीदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी' हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गाती ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.'
भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे, 'अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो' याप्रमाणे लतादीदींना चिरशांती मिळालेलीच आहे, यात शंका नाही. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.