आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रह्मांडातील लता मंगेशकर यांचा स्वर हरपला आणि मंगेशकर कुटुंबियांच्या आठ वर्षांच्या सांगलीतील वास्तव्यातील अनेक जुन्या आठवणींनी अनेकांना गहिवरून आले. पं. दीनानाथ मंगेशकर 1932 मध्ये सांगलीत राहण्यास आले. त्यावेळी अवघ्या पाच ते सहा वर्षाच्या लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबियांचे चढउतार पाहिले. तसेच सदासुख चित्रमंदिरात दिनानाथांचा गौरवकाल पाहता पाहता दारिद्रयाचे चटकेही सहन केले.
दीनानाथ मंगेशकरांना सांगलीतील राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी राजआश्रय दिला होता. सांगलीत नाट्य संगीताचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे आपल्या कलेचे येथेच चीज होईल. हे लक्षात घेऊन दीनानाथांचा मुक्काम सदासुख चित्रमंदिरात तीन ते चार वर्षाचा राहिला. सांगलीच्या मुख्य बसस्थानकाजवळ त्यांनी मंगेशकर चाळ उभी करून तेथेच आपले वास्तव्य केले. लता मंगेशकर यांनी प्राथमिक शिक्षण सांगलीतील मारूती मंदिराजवळील तत्कालीन नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 11 मध्ये घेतले. शिक्षणात रस कमी असलेल्या लता यांनी शाळेतील अध्यापनापेक्षा स्वरावर लक्ष अधिक केंद्रीत केले. दीनानाथांच्या बरोबरीनेच मास्टर अविनाश यांच्या तालमीत राहून आपला स्वर उंचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
मंगेशकर कुटुंबियांच्या सांगलीतील या वास्तव्यात लता यांना आणखीन एक मोठी भेट मिळाली ती म्हणजे त्यांची बहीण आशा यांचा जन्म. 8 सप्टेंबर 1933 मध्ये आशा यांचा जन्म सांगलीत झाला. आशा यांना सांभाळण्याची जबाबदारी लता यांच्यावर येऊन पडली होती. लहानग्या आशाला घेऊन सात ते आठ वर्षाची लता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपली माई व वडील दीनानाथ यांच्या बरोबरीनेच संघर्ष करीत होती.
लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबिय सांगलीत दाखल झाले, त्यावेळी लता यांचे नाव हेमा होते. 'भावबंधन' या नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका आणि मंत्रमुग्ध आवाजातील गाणी गायल्याने दीनानाथ यांनी त्यांचे नाव लता ठेवले. याबरोबरच मंगेशकर यांचे आडनाव हार्डिकर असे होते. परंतु गोव्यातील जागृत देवस्थान असलेल्या मंगेशी देवीचे भक्त असलेल्या दीनानाथांनी आपल्या कुटुंबियांचे आडनाव मंगेशकर केले. त्यामुळेच भारतातीलच नव्हे तर जगातील संगीताला ब्रह्मांडात स्थान देणार्या लता मंगेशकर या नावाचा तेज उजळून निघाला.
1942 साली 13 वर्षांच्या वयात मराठी चित्रपट ‘किती हसाल’साठी त्यांनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट प्रदर्शित तर झाला परंतु काही कारणास्तव त्यातून गाणे काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे लता मंगेशकर दुःखी झाल्या. याचवर्षी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. त्यांचे पहिले गाणे रिजेक्ट झाल्यानंतर 'नवयुग' चित्रपट कंपनीचे मालक आणि लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतली. याशिवाय लता मंगेशकर यांनी एक गायक आणि अभिनेत्री बनण्यासाठी देखील मदत केली.
मास्टर विनायक यांनी 1942 साली लता मंगेशकर यांना मराठी चित्रपट ‘पहिली मंगला गौर’ मध्ये एक छोटासा अभिनय करण्याची संधी दिली. या चित्रपटात त्यांनी एक गाणे देखील गायले होते. अशा पद्धतीने मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1945 साली लता मंगेशकर आपल्या जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबईत रवाना झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.