आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिखित रुपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'लताताई गेल्या, खूप वाईट वाटले. एक भावना प्रधान सूर गेला. लताताई तुमच्या आवाजाची जादू आणि सूरांचे वलय कायम ह्या पृथ्वीभोवती राहील यात शंकाच नाही, ओम शांती शांती शांती,' अशा शब्दांत सुलोचना चव्हाण यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. 5 फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र आज सकाळी 8.12 मिनिटांनी अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता शिवाजी पार्कवर विद्युत वाहिनीत लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.