आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं:'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेचा कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला भूमिपूजन सोहळा, लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरण होणार सुरू

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेच्या सेटचे महेश कोठारे यांच्या हस्ते भूमिपूजन
  • भव्य सेट उभारणीच्या कामास प्रारंभ
  • श्री जोतिबाचा आणि श्री अंबाबाईचा दरबारासह आश्रमाचा सेट

दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित "दख्खनचा राजा जोतिबा' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. महेश कोठारे यांच्या हस्ते सेट उभारणी कामाचे भूमिपूजन झाले.

कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे मालिकेचे शुटिंग सुरू राहणार आहे. यासाठी चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार असून त्याचा भूमिपूजन समारंभाला निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील उपस्थित होते. कोठारे व्हिजन्सचं कोल्हापूरशी तसं खूप जुनं व घट्ट नातं आहे. ज्योतिबाचं देवस्थानदेखील या कोल्हापूर नगरीत आहे त्यामुळेच मालिकेचं शूटिंगही कोल्हापुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी महेश कोठारे म्हणाले, "कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. कोल्हापुरातूनच अनेक सिनेमे आणि मालिका केल्या आणि एकूणच करियरला कलाटणी मिळाली. कोठारे व्हिजन संस्थेच्या माध्यमातून आजवर पौराणिक मालिकांवर भर देण्यात आला असला तरी जोतिबाची मालिका आणखी उंची गाठेल. भव्य सेटबरोबरच मालिकेसाठी वेशभूषा, विविध अलंकार या अतिशय महत्वाच्या गोष्टी असून ही मालिकाही अनेक नवे ट्रेंड निर्माण करेल. कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जातील.''

कोल्हापुरात संपूर्ण मालिका शुटिंग करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. कोल्हापूर चित्रनगरीत आता सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या मालिकेचे येथे शुटिंग शक्‍य झाले आहे. शुटींग पूर्ण होताच रोजचे एपीसोड चित्रनगरीतून थेट मुंबईतील स्टुडिओमध्ये अपलोड होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मालिका स्टार प्रवाह प्रस्तुत कोठारे व्हिजन्सची निर्मिती आहे.

  • जोतिबा आणि अंबाबाईचा दरबार

दरम्यान, चित्रनगरीत पहिल्यांदाच भव्य सेट उभारला जाणार असून दोन एकर जागेत वाडी रत्नागिरी गाव, श्री जोतिबाचा आणि श्री अंबाबाईचा दरबार आणि आश्रम साकारला जाणार आहे. हा सेटच इतका भव्य असणार आहे की हा सेट पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतील, असा विश्‍वास यावेळी महेश कोठारे यांनी व्यक्त केला. सेट उभारणीच्या कामास महिन्याचा कालावधी लागेल असा अंदाज असून आॅक्टोबरमध्ये मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. सोबतच ज्योतिबाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.