आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटाचा वाद कायम:महेश मांजरेकरांविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, यावर प्रतिक्रिया देताना मांजरेकर म्हणाले- CBFC ने माझा चित्रपट पास केला आहे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहिम पोलिसांनी महेश मांजेरकर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 292, 34, पॉक्सो कलम 14 आणि आयटी कलम 67, 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट रिलीजआधीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 14 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तत्पूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला होता. अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगाने याची दखल घेतली होती. यासगळ्या प्रकरणात आता महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिम पोलिसांनी महेश मांजेरकर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 292, 34, पॉक्सो कलम 14 आणि आयटी कलम 67, 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे वादग्रस्त चित्रिकरण, अश्लील प्रसंग, अल्पवयीन मुलांचे नकारात्मक चित्रिकरण असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील पॉक्सो कोर्टाने चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार माहिम पोलिसांनी चौकशीअंती एफआयआर दाखल केला आहे.

महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया आली समोर
आता महेश यांनी या याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, जर त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला असेल तर माझे वकील त्याला उत्तर देतील. मी माझ्या चित्रपटाच्या पाठीशी आहे. माझा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पास केला आहे, याहून अधिक मी काय सांगू, असे ते म्हणाले आहेत.

काय आहे वाद?

'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटात किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाची एक वेगळी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावातील चाळींशी संबंधित होती. किशोरवयीन मुलाचे नात्यातील प्रौढ महिलेशी संबंध चित्रपटात दाखवण्यात आले होते महेश मांजरेकरांच्या चित्रपटामुळे गिरणगाव आणि चाळीतील मुलांबाबत दिशाभूल होत असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला होता. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...