आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाण नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘तिला जगू द्या…’ असे गाण्याचे बोल आहेत. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे गाणे गायले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच ट्रेंड होत आहे.
“आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणे आहे. तिला शिकू द्या, जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या, समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी त्यांचे हे नवे गाणे प्रत्येक स्त्रीला अर्पण केले आहे. मात्र हे गाणे पाहून काही नेटक-यांनी मात्र आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांनीही त्यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. 'हिला नको गाऊ द्या', असे म्हणत त्यांनी अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले महेश टिळेकर?
महेश टिळेकर यांनी फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांना खरंच गाता येतं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी लिहिले, ''चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्व गायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे, "आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ या अशा गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी नेहमीच बिझनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,? त्यामागे काय लागेबांधे आहेत? हे एक न सुटणारे कोडे आणि जर या गायिकेकडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी. पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या "आज अमृताचा दीनु.. या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा'', अशा शब्दांत अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर जोरदार टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी आपले हे नवीन गाणे सोशल मीडियावर रिलीज केले. “कोमल आहे, नाजूक आहे, आहे जरी बावरी… तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या, खुशाल आपल्या घरी,” असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहे. गीतकार प्राजक्त पटवर्धन यांनी हे गाणे लिहिले आहे. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला त्यांच्यासह त्यांची मुलगी द्वीजाचा फोटो पाहायला मिळत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.