आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झी मराठी वाहिनीवर 31 डिसेंबर पासून 'काय घडलं त्या रात्री?' ही नवीन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास 13 वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री मानसी साळवी हिची मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री होतेय. मानसीने याआधी झी मराठीवरील 'सौदामिनी' आणि 'नुपूर' या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील गाजलेल्या 'असंभव' या मालिकेत मानसीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.
'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत मानसी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्येमागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक केली जाते. ही हूशार व चलाख पोलिस ऑफीसर तिच्या पद्धतीने प्रत्येकासमोर निडरपणे उभी राहते, पत्रकारीता असो वा राजकारण कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते.
तिच्या या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मानसी म्हणाली, "प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती एक तत्व निष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. 13 वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे आणि ते माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे."
एक प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसर या मृत्यु मागचे गूढ कसं उलगडणार हे 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. येत्या 31 डिसेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 ते 10. 30 ही मालिका भेटीला येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.