आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे स्पेशल:पत्नी निवेदिताने खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाचा विनोदाचे बादशाहा अशोक सराफ यांच्याबद्दल बरंच काही

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात अशोक सराफ यांना 'मामा' का म्हटले जाते, यासंह बरंच काही...

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर अकाउंटवर दोघांचा एक फोटो शेअर करत निवेदिता म्हणतात, 'प्रिय अशोक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या मागील आयुष्यात काहीतरी चांगले केले असावे, म्हणूनच तू मला माझा नवरा म्हणून लाभला. तू माझे सामर्थ्य, माझा गुरु, माझा जिवलग मित्र, माझे पालक माझा सर्वकाही आहेस. तू एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक चांगला माणूस आहेस,' अशा शब्दांत निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात अशोक सराफ यांना 'मामा' का म्हटले जाते, यासंह बरंच काही...

मराठी सिनेसृष्टीतील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे मराठीतले सुपरस्टार आहेत. मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

का म्हटले जाते अशोक सराफ यांना मामा?
अभिनेते अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने अशोकमामा असे म्हणतात. मात्र अशोकमामा हे नाव कसे पडले यामागे एक रंजक कहाणी आहे. एका मुलाखतीत अशोक मामाचे नामकरण कशा पद्धतीने झाले, त्याचा एक किस्सा खुद्द अशोक सरफांनी सांगितला होता. ते म्हणाले होते, "काही वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबोरबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ... पण तू त्यांना अशोकमामा म्हणायचे आणि तेथूनच मला अशोकमामा म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांतच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारु लागले."

अशोक सराफ यांच्या सिनेप्रवास
गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या सिनेमात अशोक सराफांनी एक छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणीवर काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पुरस्कार मिळविले आहेत. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यांसारख्या सिनेमातून धमाल उडवून दिली.

दादा कोंडकेंबरोबर 'पांडू हवालदार', 'कळत नकळत', 'भस्म' यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. 'वजीर'सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर 'चौकट राजा'मधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर अशोक सराफ यांनी 'सारखं छातीत दुखतंय!' हे विनोदी नाटक केलं. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. 'हम पांच' या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या.

अशोक सराफ दोनदा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. पहिला अपघात हा 1988 मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांच्या मानेला मोठा झटका बसला होता. त्यासाठी त्यांना सहा महिने विश्रांती घ्यावी लागली होती. यातून बरे झाल्यानंतर त्याांनी मामला पोरीचा या चित्रपटातून कमबॅक केले होते. तर दुसरा अपघात हा 2012 मध्ये झाला होता. यावेळीदेखील एका मोठ्या अपघातातून ते बालबाल बचावले होते. मुंबई-पुणे एक्‍प्रेसवरील तळेगावचा बोगदा क्रॉस करत असताना त्यांना गाडीचा पाठीमागील टायर फुटला होता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. एका मोठ्या अपघातातून त्यांची सुटका झाली. त्या गाडीमध्ये अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संतोष जुवेकर, दिग्दर्शक असित रेडीज व संगीतकार सतीश चंद्र होते.

बातम्या आणखी आहेत...