आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला दिले बर्थडे गिफ्ट:विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी वाढदिवसानिमित्त स्वतःचं यूट्यूब चॅनल केलं लाँच, नावं ठेवलं  ‘भारत्याचं भरीत’

उषा बोर्डे. औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भाचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणवले जाणारे विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी 15 ऑगस्ट रोजी अापला 50 वा वाढदिवस साजरा केला.
  • यानिमित्त त्यांनी स्वत:चे यूट्यूब चॅनल ‘भारत्याचं भरीत’ लाँच केले. या माध्यमातून ते लोकांना खळखळून हसवणार आहेत.

भारत गणेशपुरेे मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. त्यांचा कोणताही शाे असो की नाटक, ते तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवानी ठरते. भारत गणेशपुरे हे विदर्भातील साध्या कुटुंबातून आले आहेत. चित्रपट क्षेत्राची काही माहिती नसताना त्यांनी मुंबईत पाय ठेवला. येथे त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

  • यंदा वाढदिवस कसा साजरा केला?

यावर ते म्हणाले, कोरोनामुळे कुणी कुठे जाऊ शकत नाही. मात्र लॉकडाऊन नसते तरी मी कुठेच गेलो नसतो, कारण घरच्यांसोबत मला वाढदिवस साजरा करणे आवडते. दरवर्षी मी कुटुंबासोबतच घरीच वाढदिवस साजरा करतो. यावर्षीदेखील घरीच साजरा केला. पत्नीने या दिवशी गोडधोड केले होते. माझे आवडते पदार्थ बनवले होते, हाताने खाऊ घातले. आमच्या घरी सलग तीन महिने आम्ही वाढदिवसच साजरा करत असतो. जूनमध्ये मुलाचा, जुलैमध्ये पत्नीचा आणि ऑगस्टमध्ये माझा. यावर्षी मुलाला वाढदिवसानमित्त कॉम्प्युटर आणि पत्नीला मोबाइल घेऊन दिला. मी मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वत:लाच गिफ्ट दिले.

  • लॉकडाऊनचा वेळ लावला सत्कारणी

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद होते. सर्व कामही ठप्प हाेते. बऱ्याच दिवसानंतर कुटुंबाला वेळ देता येत होता, याचे समाधान होते. मात्र हा वेळ सत्कारणी लागला पाहिजे, या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, या उद्देशाने मी विनोदावर आधारित स्वत:च यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार केला आणि त्यावर काम केले. वाढदिवसालाच लाँच करण्याचे ठरवले होते, त्यामुळे त्यावर जोमाने काम सुरू होते. या चॅनलचे नाव ‘भारत्याचं भरीत‘ आहे. यातही वैदर्भीय बोली भाषेतून विनोद सादर केले आहेत. मी जसा पडद्यावर असतो तसाच घरीही असतो. माझा स्वभाव घरच्यांनाही माहीत आहे.

  • लवकरच येणार हिंदी आणि मराठी चित्रपट

माझा हिंदीमध्ये एक नाव न ठरलेला आणि मराठीत ‘बस्ता’ नावाचा चित्रपट येणार आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे काम रखडले होते. मात्र अाता ते सुरू होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी प्रेक्षकांचे यानिमित्ताने आभार मानतो.

बातम्या आणखी आहेत...