आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुव्रत जोशीने दिली चाहत्यांना गोड बातमी:सुव्रत-सखी यांच्या घरी आला नवीन पाहुणा, फोटो शेअर करुन म्हणाला - आम्हा दोघांत आता तिसरा आला आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुव्रतने त्याच्या पोस्टद्वारे एक सामाजिक संदेशही दिला आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे सुव्रत जोशी आणि सखी गोखले. या मालिकेच्या सेटवर हे दोघे प्रेमात पडले आणि 2019 मध्ये त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. आता या दोघांनी त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचं स्वागत केलं आहे. हा पाहुणा म्हणजे सुव्रत आणि सखीची नवीन गाडी आहे. सुव्रतने सोशल मीडियावर नवीन गाडीसोबतचा एक फोटो शेअर करत आम्हा दोघांत आता तिसरा आला आहे, असे म्हटले आहे. यासोबतच आईचे स्वप्न पूर्ण केल्याचेही तो म्हणतोय.

इतकेच नाही तर नवीन गाडी खरेदी केल्यानंतर सुव्रतने त्याच्या पोस्टद्वारे एक सामाजिक संदेशही दिला आहे. सुव्रतने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, 'माझ्या आईला 1996 पासून एक गाडी असावी अशी इच्छा होती. जवळपास 25 वर्षानंतर तिची ही इच्छा पूर्ण झाली. कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे माझ्यासाठीही ही एक आनंदाची गोष्ट आहे. मी पहिली गाडी सेकंड हॅण्ड घेतली होती. पण माझी दुसरी गाडी मात्र फर्स्ट हॅण्ड आहे. मी अनेक वर्ष गाडी न घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कामासाठी बस आणि रेल्वेवर अवलंबून राहणं शक्य नाही. शेवटी मी पेट्रोलवर चालणारी गाडी घेतली.'

सुव्रतने पुढे लिहिले, 'माझ्या समाधानासाठी मी एक गोष्ट केली. मी माझ्या गाडीचं इंजिन ऑडिट करून घेतलं. मी साधारण गाडी किती वापरणार याचा अंदाज बांधून मी किती धूर हवेत सोडणार हे काही तज्ज्ञांकडून समजून घेतलं. तो धूर शोषून घ्यायला पुढच्या पाच ते सहा वर्षात साधारण 100 झाडं लावायचा मानस आहे. त्याची सुरुवात म्हणून गाडीचे पेढे वाटण्याआधी काही वृक्ष लावायला म्हणून एक रक्कमही दिली. असंच दर सहा महिन्याला घडावं अशी इच्छा आहे. मग ही झाडं मी गाडी वापरायची थांबवल्यावरही धूर शोषत राहतील.'

सुव्रतने यावेळी चाहत्यांनाही या संकल्पनेवर विचार करण्याचे आवाहन केले आहे. 'तुम्हाला ही कल्पना आवडली असल्यास मी तर म्हणीन हे नव्या युगाची जगण्याची एक पद्धत करुया. दरवेळी नवीन गाडी घेतली की पुढची काही वर्ष आपण झाडं लावायची. आपला धूर आपणच शोषून घ्यायचा. अर्थात हे थोडे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हायला हवे म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा होईल, अन्यथा चुकीची वृक्ष लागवड केल्यानं तोटाही होऊ शकतो,' असे सुव्रतने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...