आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिव्हिजनवर पुनरागमन:'ती परत आलीये'मधून विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक, म्हणाले - 'माझ्या बोलीभाषेत आज भूमिका करताना आनंद होतो आहे'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय कदम यांचे टेलिव्हिजनवर पुनरागमन

महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सध्या एकच प्रश्न सतावतोय ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण? या मालिकेचे उत्कंठावर्धक प्रोमोज पहिल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत . या मालिकेत अभिनेता विजय कदम एका प्रमुख भीमकेत दिसणार आहेत.

ही मालिका, त्यांची व्यक्तिरेखेविषयी आणि टेलिव्हिजनवर त्यांच्या पुनरागमनाबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "मी साकारत असलेली बाबूराव तांडेल ही भूमिका अत्यंत वेगळी आणि चौकटीच्या बाहेर जाऊन सादर होणारी असल्याने माझ्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विजय कदम हा विजय कदम न वाटता तो वेगळा वाटायला हवा. त्या पात्रातून तो पोहोचायला हवा. साडेचार महिन्यांपूर्वी नीलेश मयेकरांनी या मालिकेविषयी मला विचारले आणि मी तातडीने होकार कळवला. जी बोलीभाषा मी लहानपणापासून बोलत आलोय, ऐकत आलोय त्याच बोलीभाषेत आज भूमिका करताना आनंद होतो आहे.'

ते पुढे म्हणतात, 'सर्वसाधारण कोकणातील माणूस, स्पष्टवक्ता, आजचा दिवस आनंदाने जगणारा असा हा बाबूराव आहे. तो धाडसी असल्याचे लोकांना वारंवार भासवत असतो, पण पायाखालून उंदीर गेला तरी तो घाबरतो. बरे याचे उत्तरही त्याच्याकडे तयार असते. असे गमतीशीर हे पात्र आहे. मी सस्पेन्स थ्रिलर खूप पाहिले आहेत आणि शैलीमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती जी या मालिकेमुळे पूर्ण झाली आहे. या मालिकेत मला एका उत्तम भूमिका साकारायला मिळतेय, या कथानकाचा सूत्रधार मी असल्यामुळे मला काम करताना खूप मजा येतेय."

ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहे याबद्दल सांगताना ते म्हणाले, "ती कोण आहे हे मला माहिती पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल."

याआधी टीव्हीवर त्यांच्या गाजलेल्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, " याच वाहिनीवरील ‘घडलंय बिघडलंय’ ही मालिका आम्ही आठ वर्षे केली. ज्यामध्ये मी हवालदार होतो. त्यात मी सोबतच्या शिपायाला ‘शिपॉय….तुला काय कळतं का नाय’ अशी हाक मारायचो. अशी हाक पोलीस दलातील अधिकारीही गमतीने आपल्या कर्मचाऱ्यांना मारत असल्याचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले आहेत. हीच कदाचित कामाची पावती असते."

बातम्या आणखी आहेत...