आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत 11 ऑक्टोबर रोजी बोहल्यावर चढली. तेजस देसाईसोबत शर्मिष्ठाने सप्तपदी घेतल्या. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत शर्मिष्ठा आणि तेजस यांनी आपल्या आयुष्यातील हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
फोटो शेअर करुन शर्मिष्ठाने लिहिले, ''लग्न सोहळा संपन्न💕 आज सगळ्यांनी भरभरून शुभाशीर्वाद दिले, खूप प्रेम दिले, शुभेच्छा दिल्या, तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच आम्ही आज आमच्या नव्या प्रवासाची छान सुरुवात करत आहोत. आज सगळ्यांनाच भेटणे, रिप्लाय देणे शक्य झाले नाही, पण आम्ही दोघेही तुम्हा सगळ्यांचे मनापासून ऋणी आहोत. सगळ्यांनी काळजी घ्या आणि असंच प्रेम करत राहा.''
याचवर्षी जून महिन्यात नाशिकमधल्या इगतपुरी येथील एका रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत तेजस आणि शर्मिष्ठा यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते.
या फोटोसाठी तिने भावुक असे कॅप्शन देत तेजसबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'आयुष्यात श्रीमंत जोडीदार शोधणे हे भाग्याचे नसते तर जो तुमची काळजी घेईल, जो तुमचा आत्मसन्मान जपेल आणि तुमच्याशी एकनिष्ठ असले तो तुमचे भाग्य नक्कीच बदलू शकतो', असे शर्मिष्ठाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.
शर्मिष्ठाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले असून बिग बॉसमुळे ती चर्चेत आली होती. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने काम केले आहे. 'जो भी होगा देखा जयेगा', 'टॉम अँड जेरी', 'बायको असून शेजारी', 'शंभू राजे' या नाटकात शर्मिष्ठाने काम केले आहे. फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे.
शर्मिष्ठाचे हे दुसरे लग्न
शर्मिष्ठाचे तेजससोबतचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्यासोबत झाले होते. पण काही कारणांमुळे त्यांचा संसार टिकू शकला नाही. या गोष्टींचा स्वत: शर्मिष्ठाने 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये असताना खुलासा केला होता. शर्मिष्ठा आणि अमेय यांचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांच्या परवानगीने त्याचे लग्न झाले होते. मात्र आयुष्यात काही निर्णय चुकतात तसा लग्नाचा निर्णय चुकल्याचे तिने या शोममध्ये म्हटले होते. घटस्फोट झाल्यानंतर ती एका मानसिक तणावातून गेल्याचेही शर्मिष्ठाने सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.