आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते मावशी-भाच्याचे:हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेची मावशी आहे अभिनेत्री वीणा जामकर, पोस्ट शेअर करत म्हणाली...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर दिग्दर्शक ओम राऊत यांनी 'आदिपुरुष' या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेचा लूक समोर आणला आहे. ध्यानस्त बसलेल्या हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा देवदत्त नागे दिसतोय. अभिनेत्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुळचा अलिबागच्या असलेल्या देवदत्त नागे अभिनयासोबतच त्याच्या पिळदार शरीरयष्ठीसाठीही ओळखला जातो. आणि त्याने आपल्या शरीरावर घेतलेली मेहनत 'आदिपुरुष'च्या या नवीन पोस्टरमध्येही दिसून येतंय. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर हिने देवदत्त नागेचे हे पोस्टर शेअर करत त्याच्याशी असलेले जवळचे नाते सांगितले आहे.

वीणा देवदत्तची मावशी असून तो तिचा भाचा असल्याचे तिने सांगितले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच दोघांचे हे नाते समोर आले आहे. इतकेच नाही तर देवदत्त आणि वीणा यांचे कौटुंबिक संबंध असूनदेखील दोघांची पहिली भेट जय मल्हार या मालिकेच्या सेटवर झाल्याचे वीणाने सांगितले आहे.

आदिपुरुषचे पोस्टर शेअर करत वीणाने देवदत्तचे तोंडभरुन कौतुक केले आहे. ती लिहिले, "आज मला एक बात सांगायची आहे... हा हनुमान अ‍ॅक्टर देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी.. पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते 'जय मल्हार'च्या सेटवर.. कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही. अतिशय मेहनत, जिद्द आणि त्याच्या शरीरयष्टी सारखीच बलदंड इच्छाशक्ती.. यांच्या जोरावर देवदत्त यशाची शिखरं चढतो आहे आणि चढतच राहिल...! त्याचा खूप अभिमान वाटतो. तो फक्त अ‍ॅक्टर म्हणून नाही तर एक अतिशय नम्र, हुशार असा कुटुंबातला एक सदस्य म्हणून सुद्धा! मी एकतरी मालिका करावी म्हणून मला सतत मोटिव्हेट करत राहिला आणि तिथेच न थांबता आता तो माझा मेंटॉर आहे!" असे वीणाने सांगितले आहे.

ती पुढे सांगते, "मला काहीही अडचण आली की 'देवा' माझ्या मदतीला हजर असतो.. माझा इतका छान भाचा मला माझ्या लहानपणीच भेटायला हवा होता... म्हणजे लुटूपुटूची 'मावशी - भाच्याची' जोडी गणपतीत खूप खेळली असती.... असो. आज सकाळी हनुमान जयंतीच्या इतक्या सुंदर, अद्भुत शुभेच्छा मिळाल्या...! काय अप्रतिम पोस्टर आहे!!! अजून कोण बनू शकला असता 'हनुमान'?? बालम (त्याचं घरातलं नाव) We are so so proud of you!!!! तुझ्या जिद्दीला सलाम... तुझी सगळी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत अशी मन:पूर्वक प्रार्थना.... आदिपुरुषसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!" असे वीणा म्हणाली.

देवदत्त नागेने याआधी अनेक मराठी मालिक आणि चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतून देवदत्त घराघरात पोहोचला. देवदत्तने यापूर्वी ओम राऊत यांच्यासोबत 'तान्हाजी' चित्रपटात काम केले होते. याशिवाय तो 'बाजीराव मस्तानी', 'सत्यमेव जयते' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे.

दुसरीकडे वीणा जामकर ही देखील मराठी चित्रपट, टीव्ही आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध आहे. 'जन्म', 'कुटुंब', 'तुकाराम', 'विहीर', 'वळू' यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सध्या ती छोट्या पडद्यावर 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतेय.