आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बाप हा बाप असतो आणि आई ही आई असते’, असं अनेकदा ऐकलंय. पण आई-बापाची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही हे देखील तितकंच जगमान्य सत्य आहे. नात्यांमध्ये कधी-कधी खटका उडतो, कधी दु:ख वाटेला येतं पण नात्यांमधला आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन, हेवेदावे बाजूला ठेवून नाती जपावी लागतात आणि मुख्य म्हणजे नात्यात संवाद असावा लागतो... असा सुंदर संदेश देणारा नवा कोरा मराठी सिनेमा ‘अवांछित’ येत्या 19 मार्चला झीप्लेक्स वर तुमच्या भेटीला येतोय.
निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा यांच्या ‘फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट’ प्रस्तुत आणि शुभो बासु नाग दिग्दर्शित ‘अवांछित’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. दोघांचे भिन्न स्वभाव, एकमेंकांविरोधी मतं असणा-या वडील- मुलाची भूमिका अभिनेते किशोर कदम आणि अभय महाजन यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबतीला मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण आणि राजेश शिंदे हे देखील या सिनेमाचा भाग आहेत. सिनेमाला अनुपम रॉय यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
सिनेमा जरी मराठी असला तरी सिनेमातील लोकेशन्स पश्चिम बंगाल, कोलकाता येथील आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कोलकाता येथील राहणीमान, संस्कृती मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहेच, पण त्यासोबत या नवीन आशय असलेल्या सिनेमात बंगाली कलाकार बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर यांचा अभिनय पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.
अनोखी कथा, उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन, संगीत आणि थेट मनाला भिडतील असे संवाद घेऊन ‘अवांछित’ 19 मार्चला झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.