आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी चित्रपटाची गरुडझेप:देशविदेशातील चित्रपट महोत्सवात दरवळतोय ‘काळी माती’चा सुगंध, तब्बल 52 पुरस्कारांवर उमटवली मोहोर

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भेगाळल्या भुईतून सोनं पिकविणाऱ्या ज्ञानेश्वर बोडके यांची संघर्षगाथा

प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत ‘काळी माती’ या मराठी चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच देशविदेशातील अनेक चित्रपट सोहळ्यांमध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुण्याच्या मावळ प्रांतातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी आणि प्रेरणादायी व्याख्याते ज्ञानेश्वर बोडके यांनी सेंद्रीय समुह शेतीच्या माध्यमातून केलेली वार्षिक साडेचारशे कोटी रुपयांची उलाढाल हा प्रेरणेचा आणि कौतुकाचा विषय असला तरी त्यासाठी त्यांनी अन् त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला संघर्ष ‘काळी माती’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

कोविडच्या कठोर निर्बंधामुळे मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला. त्यात अनेक चित्रपट महोत्सव स्थगित झाल्याने सिनकर्मी आणि रसिकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. पण जिथे जिथे चित्रपट महोत्सव संपन्न होत आहेत. तिथे तिथे एच.एम.जी एंटरटेनमेन्ट निर्मित हेमंतकुमार महाले दिग्दर्शित ‘काळी माती’ हा चित्रपट चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. 42 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, 7 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, संगीत आणि छायांकनासाठी प्रत्येकी एक असे एकूण 52 पुरस्कारांनी काळी माती चित्रपटाला गौरविण्यात आले आहे.

शेती, शेतकरी आणि शेती व्यवसाय हा चिंतेचा विषय सध्या देशभरात चांगलाच गाजतोय. पण, पुण्याच्या ज्ञानेश्वर बोडके यांनी चिंताक्रांत शेतीउद्योगाला स्वत:च्या अभिनव संकल्पनेने तब्बल साडेचारशे कोटी रुपये वार्षिक नफा कमवून समृद्ध केले. हा क्रांतिकारी बदल त्यांनी कसा आणि कोणत्या परिस्थितीत केला, हे पाहताना चित्रपट परिक्षकही अवाक् झाले. शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार आणि बँकांच्या भूमिकेबद्दल अनेक अंगाने चर्चा होत असते पण, या दोन महत्त्वाच्या घटकांची भूमिका आणि सहकार्याचे शेतीउद्योगातील महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाल्याने आणि शेती हा निव्वळ फायद्याचा उद्योग आहे. हे या चित्रपटातून व्यवस्थितरित्या उलगडून दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी झाल्याचे मत अनेक परिक्षकांनी नोंदवल्याचे चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी सांगितले. मनोरंजनापलिकडचे विषय चित्रपटात आणून त्याला समाजापर्यंत सहजतेने पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य घडत असल्याने चित्रपटाबाबत कमालीचे कुतुहल निर्माण होत आहे.

मराठी टेलिव्हीजन क्षेत्रातील आघाडीचा नायक ओमप्रकाश शिंदेने या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडकेंची भूमिका वठवली आहे. त्याच्यासह भगवान पाचोरे, पुनम पाटील, नवतारका एतशा संझगिरी, दिक्षा भोर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पटकथा मयूर आडकर, संवाद अनिल राऊत यांचे तर ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांच्या नजरेने हा सिनेमा साकारला गेला आहे. अविनाश विश्वजीत यांचे संगीत दिग्दर्शनाने हा सिनेमा सजला आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...