आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT वरील आगामी मराठी चित्रपट:'फोटो प्रेम'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी अमेझॉन प्राइमवर होणार चित्रपटाचा प्रिमिअर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीना कुळकर्णी, अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

आगामी 'फोटो प्रेम' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. येत्या 7 मे रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे. सोबतच अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

'फोटो प्रेम' ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईचा कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी तो संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.

या चित्रपटाबद्दल सांगताना नवोदित दिग्दर्शक आणि सहलेखक आदित्य राठी म्हणाले, “फोटो प्रेम' ही एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा आहे आणि प्रत्येकाला ही कथा त्यांच्या जवळची कथा वाटेल. प्रत्येक माणसामध्ये आढळणारी भावनिक बाजू या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. आपल्या मृत्यूनंतर जग आपल्याला कसे लक्षात ठेवेल याचा ते विचार करू लागतात, हा धागा या चित्रपटाच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडियोशी सहयोग केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण त्यामुळे मराठी प्रेक्षकांसोबतच भारतभरातील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचू शकेल. अलीकडेच आमचा ‘पिकासो’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित करण्यात आला. त्याच्या यशाच्या आनंदाचा आम्ही आस्वाद घेत असतानाच आता या स्ट्रीमिंग सर्व्हिसवर आम्ही 'फोटो प्रेम' हा आमचा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. मराठी भाषेत अत्यंत दर्जेदार चित्रपट अलीकडे प्रदर्शित होत आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आणि 'फोटो प्रेम' हीसुद्धा त्याच शृंखलेमधील पुढील कलाकृती असेल, असा मला विश्वास आहे.”

चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी म्हणाल्या, “'फोटो प्रेम' ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांना पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचेही प्रेम या चित्रपटाला लाभेल, अशी मला आशा आहे.”

अशी आहे चित्रपटाची वनलाइन
एका अंत्यविधीला गेलेल्या माई या गृहिणीला जाणवते की अशा परिस्थितीत लोकांना मृत व्यक्तीचा एक फोटो हवा असतो, जो त्याच्या/तिच्या स्मरणार्थ लावता येऊ शकेल. तिला जाणवते की, तिला फोटो काढण्याविषयी एक प्रकारची भीती असल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर लावायला तिचा एकही चांगला फोटो नाही. त्यामुळे तिला वाटते की, तिच्या मृत्यूनंतर ती विसरली जाईल कारण फोटो नसेल तर ती कशी होती हे कुणालाही कळू शकणार नाही. त्यानंतर, आपली कॅमेऱ्याची भीती घालविण्यासाठी आणि चांगला फोटो काढून घेण्यासाठी ती प्रयत्न करू लागते. अखेर, तिचे व्यक्तिमत्व दर्शविणारा फोटो तिला मिळेल का? आणि लोकांना त्या फोटोमधून तिच्याविषयी आपुलकी वाटेल का?, हे या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...