आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीताचा सूर घेऊन येतोय 'पिकोलो':प्रत्येक वेदनेवरची हळुवार फुंकर, प्रणव आणि अश्विनी दिसणार मध्यवर्ती भूमिकेत

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना दिसताहेत. हीच बाब ध्यानात घेऊन फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आजच्या पिढीसमोर असणारे प्रश्न, त्यांना पेलावी लागणारी आव्हानं या साऱ्याचं चित्रण करत नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर संगीताच्या माध्यमातून अलगदपणे उलगडून सांगणारा ‘पिकोलो’ हा संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले.

प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे इप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे.

या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...