आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकामागोमाग एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस:'लॉ ऑफ लव्ह', 'वन फोर थ्री', 'का रं देवा' 11 फेब्रुवारीला होणार रिलीज, सुभाष घईंच्या 'विजेता'ची रिलीज डेट जाहीर

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी चित्रपटांची महत्त्वाची बातमी

लॉकडाउननंतर आता मराठी चित्रपटांनी देखील उभारी घेतली आहे. नवीन चित्रपटांच्या रिलीज डेट जाहीर होत आहेत. तर लॉकडाउनपूर्वी प्रदर्शित झालेला पण त्यानंतर लगेचच थिएटर बंद पडल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न शकलेला सुभाष घई यांचा 'विजेता' हा चित्रपट देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. तर भूषण प्रधानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अजिंक्य या चित्रपटाला आयएमडीबी (IMDb) वर 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळाले आहेत. या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

  • मोनालिसा बागलचा 'का रं देवा' 11 फेब्रुवारीला होणार रिलीज

आगामी का रं देवा या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल झळकणार आहे. एक आदर्शमय प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं असून, पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 11 फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांची गीतं संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

अभिनेत्री मोनालिसा बागलनं "झाला बोभाटा" या चित्रपटातून आपली छाप उमटवली होती. त्याशिवाय करंट, रावरंभा आणि भिरकीट अशा उत्तमोत्तम आगामी चित्रपटातही मोनालिसा महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे.या चित्रपटात मोनालिसाचा नायक कोण असणार? हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असून अभिनेते अरुण नलावडे, नागेश भोसले आणि जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहेत.

  • व्हॅलेंटाईन वीकमध्ये येणार लॉ ऑफ लव्ह

प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा "लॉ ऑफ लव्ह" हा सिनेमा येत्या व्हॅलेंटाईन सप्ताहात म्हणजेच दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या संबंधित एक सुंदर चित्रफीत सोशल मीडियावर पोस्ट करत निर्मात्यांनी चित्रपट चाहतेवर्गाला ही गोड बातमी दिली आहे. अभिनेता जे. उदय यांचा चित्रपट निर्मिती तसेच अभिनयाचा पहिलाच अनुभव असून त्यांच्या सोबत असलेली अभिनेत्री शालवी शाह देखील या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याप्रमाणेच सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी तसेच यतीन कार्येकर यांची देखील मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची तारीख जाहीर करताना निर्माते तसेच अभिनेते जे. उदय सांगतात,"प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की या चित्रपटातुन आम्ही प्रेक्षकांची मने जिंकू."

  • प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री' चित्रपटातून 11 फेब्रुवारीला झळकणार मोठ्या पडद्यावर

रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटानेही आपले नाव यादीत नोंदविले आहे, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येत 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेल्या नव्याकोऱ्या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, पुणे येथे गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन समस्त चित्रपटाच्या टीमसह नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाचे विविध रंग मांडत या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. चित्रपटाच संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. हे आपलं काळीज हाय या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या 11 फेब्रुवारी ला व्हॅलेंटाईन डे विकमध्ये हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे.

  • खेळाची पार्श्वभूमी असलेला सुभाष घाई यांचा मराठी चित्रपट 'विजेता' पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज, 10 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

मुक्ता आर्ट्सची निर्मिती असलेला चित्रपट "विजेता" 12 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता पण कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन एकादिवसात मागे घेण्याचा निर्णय सुभाष घाई यांनी घेतला . पण आता परिस्थिती पुन्हा हळू हळू पूर्व पदावर येत आहे आणि मुक्ता आर्टस् ने विजेताचे पुन्हा प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे, पुजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचक्के, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांचा समावेश आहे.

खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. सौमित्र पुढे महाराष्ट्राला जिंकवून देणं हे त्याचं ध्येय असतं . तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो . त्या सर्वांमधील हरवलेला आत्मविश्वास कसा परत आणतो, त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो हे सर्व तुम्ही अनुभवू शकाल विजेतामध्ये.

  • देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणारा चित्रपट- अजिंक्य

19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे चित्रीत अजिंक्य या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट विश्लेषकांकडून कौतुक होताना दिसत आहे. अमराठी निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे, आणि वेद. पी शर्मा यांनी अजिंक्य या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आल्या कारणाने त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे म्हटले आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरू शकेल.

शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या अजिंक्यची आणि सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी याच कारणामुळे सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आयएमडीबी (IMDb) वर सदर चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळाले आहेत. चित्रपटाचे निर्माते हे अमराठी असले तरी त्यांना भारतीय शेतकरी आणि त्यांच्या व्यथा ते जवळून जाणतात आणि म्हणूनच दिग्दर्शक अ. कदिर यांच्या उत्कृष्ट संकल्पनेला त्यांनी होकार देत या चित्रपटासाठी आर्थिक सहकार्य उभे करण्याचे धाडस केले. चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजेच अजिंक्य आणि रितिकाच्या भूमिकेत असलेले भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...