आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालिकेला विरोध:‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप, चित्रीकरण बंद करण्याची ज्योतिबा ग्रामस्थांची मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेचे कथानक केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले, तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ज्योतिबा ग्रामस्थांनी केली आहे.

अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने 23 ऑक्टोबरपासून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर आता ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणा अन्यथा उद्रेक होईल, वाडीरत्नागिरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे.

...तरच परवानगी देऊ

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ‘कोठारे प्रॉडक्शन’चे सर्वेसर्वा महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगीही घेतली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शिवाय मालिकेचे कथानक केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले, तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ज्योतिबा ग्रामस्थांनी केली आहे. यावर अद्याप महेश कोठारे यांची प्रतिक्रिया आलेली नाही

कोल्हापुरात सुरु आहे मालिकेचे चित्रीकरण
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेले नाही. आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली. विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.

कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि त्यांच्या टीमने मालिकेचा सेट उभारला आहे. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. त्यांची मराठी विषयात पीएचडी झालेली आहे. संशोधक आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात ते परिचित आहेत. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.