आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसाठी एका पत्नीची इमोशनल नोट:मयुरी देशमुखने आपल्या भावनांना मोकळी करुन दिली वाट, म्हणाली - 'इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेल'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 ऑगस्ट रोजी आशुतोषचा 32 वा वाढदिवस होता.

अभिनेता आशुतोष भाकरेने 29 जुलै रोजी नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून आशुतोष नैराश्येतून जात होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही आशुतोषची पत्नी आहे. त्याच्या निधनाच्या 13 दिवसांनी मयुरीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 11 ऑगस्ट रोजी आशुतोषचा 32 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मयुरीने केकचा एक फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाली मयुरी?

“आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक तयार केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा… 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस.

आम्हाला माहित आहे की, तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो. आपण किती चांगलं काम करत होतो. थोडं आणखी परिश्रम घ्यायची गरज होती. दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी. आपली. मला अर्ध्या वाटेत सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की जितका वेळ माझ्यासोबत होतास याबद्दल कृतज्ञ असावं? पण त्याने काय फरक पडतो?

तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत. देवदूतांचे ऐक. आता नेहमीसारखा हट्टीपणा करु नकोस.

मी, अभी, मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असावे, अशी आशा आहे. इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझीच, #बायकोतुझीनवसाची

मयुरीसह आशुतोषची आई अनुराधा भाकरे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आशुतोषसोबत नक्की काय घडलं होतं आणि तो कशाप्रकारे नैराश्येचा समाना करत होता, याकाळात त्याला मयुरी आणि संपूर्ण कुटुंबाची कशी साथ मिळाली हे सांगितले आहे. सोबतच नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार, त्याकडे दुर्लक्ष करु नका. एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या, रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारात्मकतेने पहा अशी कळकळीची विनंतीदेखील केली आहे.

लॉकडाऊनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. 29 जुलै रोजी आशुतोषची आई आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. 20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोषचे लग्न झाले होते. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...