आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोदावरी', 'सनी'चे शो कमी केल्याने मनसेचा इशारा:मल्टीप्लेस चालकांना धडा शिकवण्याची वेळ आलीये - अमेय खोपकर

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जितेंद्र जोशीचा 'गोदावरी' आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी या चित्रपटांना हाऊसफुल्लचा बोर्ड झळकतोय. मात्र असे असूनही काही ठिकाणी या चित्रपटांचे शो चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने रद्द केल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वतः हेमंत ढोमेने ट्विट करत या यासंबंधी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. मराठी चित्रपटांना दिल्या जाणा-या दुय्यम वागणूकीकडे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी ट्विट करत मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे. सनी आणि गोदावरी चित्रपटांचे शो कमी करणे संतापजनक असून मल्टिप्लेक्स मालकांना धडा शिकवण्याची वेळ आलीये, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर?
अमेय खोपकर यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे, ते म्हणतात, "आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला गोदावरी आणि प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचत असलेल्या सनी या दोन्ही चित्रपटांचे शोज सोमवारी कमी झाले, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. लोकप्रिय आणि चांगल्या कलाकृतींना बळ देणे हे गरजेचे आहे. 'सनी' चित्रपटाला किती गर्दी होतेय हे सोशल मीडियामधील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. असे असूनही मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे," असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

हेमंत ढोमेनेही व्यक्त केला संताप
मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हेमंत ढोमेने खरमरीत ट्वीट केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “आपल्या अजून एका प्रेक्षकाबरोबरही तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 कल्याणमधला हा प्रकार… प्रेक्षक जात असूनही चित्रपट असा डावलला जाणे चूक की बरोबर?, दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?” असे हेमंत म्हणाला.

मनसेच्या इशा-यानंतर मल्टिप्लेक्स चालक काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी' या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. त्याच बरोबर चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तर 'गोदावरी' या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, गौरी नलावडे, विक्रम गोखले यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बातम्या आणखी आहेत...