आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती महाराणी ताराबाई भोसले... मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री होत्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.
सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेले अनेक महिने चर्चा होती. नुकतेच याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टिझरच्या सुरुवातीलाच सोनाली कुलकर्णी साकारात असलेल्या ताराराणी यांचा करारी अंदाज दिसत आहे. तर त्यांनी दाखवलेल्या पराक्रमांची झलक ही या टिझरमधून समोर येत आहे. या टिझरमध्ये छत्रपती ताराराणी औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध मराठ्यांचे नेतृत्व करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारा असा हा टिझर आहे.
हा चित्रपट मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर हा चित्रपट आधारीत असून, “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील नावाजलेली ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ‘ आणि ‘ओरवो स्टुडिओ’ ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणारा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.
नटरंग, पोस्टर गर्ल, अजिंठासारख्या गाजलेल्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटात छत्रपती ताराराणीची भूमिका साकारणार आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार होणा-या या चित्रपटाचा 10% भाग भारतात शूट केला जाणार आहे आणि उर्वरित 90% चित्रीकरण यूकेत होणार आहे. सोनालीने तिच्या पात्रासाठी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लाठी-काठीचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी केलेली ही खास बातचीत..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.