आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं. 2019 मध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका. चित्रपटासोबतच मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटगृहात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या घरी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत साधलेला हा खास संवाद
- इतिहास हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मी नेहमी असं म्हणते माझे आजोबा प्रख्यात कादंबरीकार गो. नी. दांडेकर ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भरभरून प्रेम केलं आणि ते लोकांमध्ये वाटलं. त्यांच्याकडून हा वारसा मला मिळालेला आहे असा मला वाटतं. मी पहिल्यांदा जिजाऊ आऊसाहेबांची भूमिका साकारली आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप जास्त आनंद होतो. एक आई म्हणुन, एक माणूस म्हणुन जिजाऊ आई साहेबांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. ही भूमिका मी आयुष्यभर जरी करत राहिले तरी मला असं वाटतं की, अजून शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळे फत्तेशिकस्त मधील ही भूमिका साकारताना मला अत्यानंद झाला. मला दिग्पाल लांजेकरचा अभिमान वाटतो की त्याने महाराजांचं चरित्र अत्यंत योग्यरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
- आधी ही भूमिका साकारली असल्यामुळे भरपूर वाचन झालेलं होतं. पण प्रत्येक वेळेला नवीन पैलू दाखवण्याची संधी आपल्याला मिळते याचा जास्त आनंद होतो. जिजाऊ आऊसाहेब फक्त कारभार संभाळत नसत तर त्या प्रसंगी तलवारसुद्धा हातात घेत असत. मावळ्यांना वेळेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या संघटना तयार करत असत. या सगळ्या गोष्टी या सिनेमातून दाखवण्याची संधी मला मिळाली याचा मला जास्त आनंद होतो. त्यामुळे या वेळेला वेगळाच उत्साह होता. जिजाऊ आऊसाहेबांचं युद्ध नैपुण्य आणि राजकारणातल कौशल्य दाखवण्याची संधी मला फत्तेशिकस्तच्या माध्यमातून मिळाली.
- किल्ले राजगडवर आम्ही शुटिंग केलं. ती घटना आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होती. हा माझा सर्वात आवडता किल्ला आहे. मी आजोबांसोबत आणि त्यानंतरसुद्धा अनेकदा या किल्ल्याची सफर केलेली आहे. सुमारे 25 वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. या किल्यावर शूटिंग करण्याची संधी मिळाली हा खरोखर अंगावर काटा आणणारा क्षण होता. तिथे जाऊन तोच काळ जागं करणं हा खरंच खूप सुंदर अनुभव होता. आयुष्यभर सर्वांच्या आठवणीमध्ये हा प्रसंग राहील. महाराजांनी हा किल्ला कसा बांधला असेल? महाराज इथून राज्यकारभार कसा सांभाळत असतील? असे अनेक प्रश्न ज्यांनी हा किल्ला पहिल्यांदा चढला त्यांना पडत होते. सर्व कलाकारांनी आपल्या पाठीवर शूटिंगच सर्व सामान घेऊन किल्ला चढला. महाराजांचा इतिहास समोर येण्यासाठी आपलाही छोटा हातभार आहे हा विचार खूप आनंद देऊन जात होता.
- माझी एन्ट्री झाल्यावर प्रेक्षक भयंकर खुश होत होते. एक आईच आपलं मुल अशाप्रकारे घडवू शकते. ज्या मातेने स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे आपलं स्वप्न मुलाच्या मनात सतत घोळवत ठेवलं आणि बिंबवलं आणि त्याच्याकडून ते पूर्ण करुन घेतलं अशा आईच्या एन्ट्रीसाठी मिळणारा प्रतिसाद हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. सिनेमाच्या शेवटी येणारं जिजाऊ आऊसाहेबांचं चित्र हा माझ्यासाठी एक थरारक अनुभव होता. या स्वराज्य चळवळीचा प्रारंभ म्हणजेच जिजाऊ आऊसाहेब आहेत याचं भान मला आलं.
- मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करते की फक्त शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर महाराजांचं चरित्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्यातल्या अनेक गोष्टी आपण अंगी बाळगायला शिकलं पाहिजे. कोरोनाच्या संकटातसुद्धा आपण महाराजांसारखं सकारात्मक राहून या संकटातुन आपली सुटका करून घेतली पाहिजे. ज्या माय लेकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी दिलं त्यांना कायम आपण त्रिवार वंदन केलं पाहिजे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि यानंतर जंगजौहर या सारख्या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करू. तुमच्या सर्वांची मदत फार मोलाची असणार आहे. तुमच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच आम्ही आपल्या समोर महाराजांचा इतिहास योग्यरित्या मांडू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.