आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात ‘एनसीबी’ टीम सहभागी झाली. या तपासात शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आहेत समीर वानखेडे. तपासकार्यात वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमधील अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जाते.
समीर वानखेडे यांच्या टीमने भल्या पहाटे धाड टाकून आधी सॅम्युएल मिरांडाच्या घराची झाडाझडती घेतली. त्याला चौकशीसाठी उचलले. त्याच वेळी वानखेडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी पोहोचले होते. तिच्याही घरात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला ताब्यात घेतले.
खास गोष्ट म्हणजे समीर वानखेडे हे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर हे समीर वानखेडे यांच्या पत्नीचे नाव आहे. 2017 मध्ये क्रांती आणि समीर यांचे लग्न झाले. या दाम्पत्याला जुळ्या मुली आहेत.
कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाड टाकली आहे. त्यामध्ये विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलीकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.