आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 6 डिसेंबरपासून मुंबईत सुरूवात झाली आहे. चित्रपटात शिवछत्रपतींची भूमिका वठवणारा अभिनेता अक्षय कुमारने स्वतः एक ट्वीट करत याची माहिती दिली होती. खरं तर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो वादात सापडला आहे. आता या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. दरम्यान या चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही फोटो शेअर केले आहेत. "जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातयं असं वाटतं”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली होती तेव्हादेखील जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी या चित्रपटावर टीका केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातील मावळ्यांच्या वेशभूषेवर राजेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अक्षयने शेअर केला होता चित्रपटातील लूक व्हिडिओ
अक्षयने मंगळवारी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिले, "'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात होत आहे. या चित्रपटात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी पूर्ण प्रयत्न करेन. सर्वांनी आशीर्वाद द्या," असे अक्षय म्हणाला आहे. यासह निर्मात्यांनी अक्षयचा शिवाजी महाराजांच्या लूकमधील एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा झाली होती. यावेळी चित्रपटातील कलाकारांचा लूक रिव्हील करण्यात आला होता. मात्र कलाकारांच्या लूकमुळे गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.