आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभराच्या विरामानंतर आता सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वातही नव्या घडामोडी घडू लागल्या आहेत. आखून दिलेल्या नियमांचे पालन करून मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला वेग आला आहे. होळी आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधून नुकतीच ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
‘पिग्मॅलिअन’वर आधारलेलली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म जगभर चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एक वेगळी फुलराणी या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ही कलाकृती चित्रपटाच्या रूपात साकारण्याचे काम सध्या जोरात सुरू झालं आहे.
‘फुलराणी’ ही कलाकृती प्रत्येक मराठी मनाच्या अतिशय जवळची आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावरची फुलराणी कोण असणार? नेमकी कशी असणार? याविषयी प्रत्येकालाच कुतूहल आहे. मात्र त्याआधी ‘फुलराणी’ पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञांची नावे नुकतीच एका पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली आहेत.
‘फुलराणी ... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ या कलाकृतीचे लेखन गुरु ठाकूर व विश्वास जोशी यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, संकलन गुरु पाटील तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे करीत आहेत. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. फिनक्राफ्ट मिडिया प्रोडक्शन या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
उत्तम कलाकार व तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा हा बहर 2021 ला चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.