आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका 2 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.
नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल.
प्रसिद्ध अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. याविषयी सांगताना भूषण प्रधान म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझं देखिल स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यसोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे. लूकपासून सेटपर्यंत सगळं काटेकोरपणे पाहिलं जातंय. आमचे वर्कशॉप्स घेतले जात आहेत.’
या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच मातीशी निगडीत आणि रुतलेल्या सशक्त कथा सादर करण्याचा प्रयत्न करत असते. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.’ या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. 2 मे पासून रात्री 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.