आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मालिका:दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’,  अभिनेत्री मनवा नाईकची आहे निर्मिती

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘वजनदार मुलीची, दमदार कथा - सुंदरा मनामध्ये भरली’ 31 ऑगस्टपासून पासून सोम ते शनि रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रत्येक तरुण मुलीच्या हातात सिंड्रेलाचा आरसा असतो ज्यामध्ये तिचं रूप तिच्यासाठी सुंदरचं असतं... पण प्रश्न हा असतो की बघणारी व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघते... सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना आहे... "मी कशाला आरशात पाहू गं...मीच माझ्या रूपाची राणी गं" हे गाणं आजही वयात आलेली मुलगी आरशासमोर उभी राहून गुणगुणते. परंतु आजच्या काळात सौंदर्याची व्याख्या जरा बदलेली दिसते. म्हणतात ना ‘क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप’ अगदी तसंच काहीसं ! नजरेमध्ये जे भरतं त्यालाच काही लोक सौंदर्य मानतात. जोडीदाराच्या बाबतीत त्यांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. प्रत्येकच तरुणाला हवी आहे ती सुंदर, झिरो फिगर, शेलाट्या बांध्याची साथीदार... बाह्यरुपावर माणूस हुरळून जातो हा तर मनुष्य स्वभावचं... "ठेंगणी' ,"सावळी, "थोडी जाडी", "स्थूल" अशी नावं ठेवत काही मुलींच्या पदरी नकार येतो. थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला 'नकार' देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’.

मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने केली आहे. अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारणार आहेत.

  • काय आहे मालिकेची कथा?

आपल्या सगळ्यांच्या घरात अशी एक व्यक्ती असते जिच्या असण्याने घराला घरपण येते. आपली 'लतिका' देखील अगदी अशीच आहे. उत्तम विनोदबुध्दी, खेळकर, शाळेपासून अभ्यासात प्रचंड हुशार, उत्तम स्वयंपाक करते. इतकं सगळं असून देखील निव्वळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून लतिकाला समाजाकडून टोमणे ऐकावे लागतात आणि याच एकमेव कारणाने तिचे लग्न देखील अद्याप जमले नाही. 34 स्थळांकडून आजवर तिला नकार आला आहे. सगळ्यांना आनंदी ठेवणारी, सुख - दु:खात साथ देणार्‍या लतिकाने या गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि याचा तिला फारसा फरकही पडत नाही.

याउलट दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा आपला फिटनेस फ्रिक अभिमन्यू. स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला 'फिट' करायचं आहे म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. अभिमन्यूचं स्वप्न आणि लतिकाचं लग्न यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ? लग्नाबद्दल या दोघांचीही मत वेगळी आहेत. त्यांची मनं कशी जुळतील ? हा प्रवास पाहणं रंजक असणार आहे.

कथेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असतं म्हणतात.. पण तरी आपल्या समाजात सौंदर्याच्या कल्पनांची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेतच ! कमनीय बांधा याला पर्याय नाही. जाडी हा आपल्याकडे विनोदाचा विषय मानला जातो आणि जाडी माणसंही ! तिच्या जाडेपणापलीकडे असणारं तिचं आयुष्य आपण समाज म्हणून बघू शकतो का? "सुंदरा मनामध्ये भरली" ही अशाच एका समाजाने बेढब ठरवलेल्या संवेदशील मनाच्या मुलीची गोष्ट आहे. सौंदर्याच्या परिमाणात न बसणाऱ्या मुलीची आणि पुरुषी सौंदर्याच्या मोजमापात फिट्ट बसणाऱ्या देखण्या तरुणाची प्रेमकथा.. बाह्य सौंदर्याच्या पुढे नेणारी.. मनाच्या नात्याला मोठं करणारी प्रेमकथा म्हणजे ही मालिका’.

मालिकेची निर्माती मनवा नाईक म्हणाली, ‘लॉकडाउनमुळे आलेली मरगळ दूर करण्याची संधी आम्हाला या’सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे मिळाली आहे या भावनेने संपूर्ण टीम प्रचंड काम करत आहे त्यामुळे एक नवा उत्साह आहे. मालिकेचा विषय खूप वेगळा आहे आणि त्याला आम्ही अतिशय साध्या सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठलाही नवा शो करताना टेंशन हे येतच पण या शोची मजा अशी आहे मालिकेचे संपूर्ण शूटिंग नाशिकला होणार आहे. इकडची भाषा, त्यांची बोलण्याची पध्दत, हिरवगार शेत आणि विविध पदार्थांची रेलचेल यासगळ्यासोबत शूटिंगची देखील मजा घेतली जाते आहे. आमची ही नवीन मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्की भरेल अशी अपेक्षा आहे'.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser