आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडदा:नवी मालिका 'स्वाभिमान' लवकरच, अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वाभिमान’ ही मालिका प्रसारित होणार आहे.

छोट्या पडद्यावर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. पूजा बिरारी ही गुणी अभिनेत्री पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत असून स्वाभिमान या मालिकेतून ती टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. यासोबतच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळेल.

स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘स्वाभिमान’ या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. येत्या 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वाभिमान’ ही मालिका प्रसारित होणार आहे.