आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मालिका:हळुवार प्रेमकहाणीला रहस्याची किनार – ‘चंद्र आहे साक्षीला’, ही आहे सुबोध भावेच्या नव्या मालिकेची कहाणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री 8.30 वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

थंडीच्या दिवसात सकाळी उठलं की, निसर्ग, आजूबाजूची झाडं, डोंगर सगळीकडेच धुकं असतं. डोळ्यांना दिसायला अगदी छान असतं. पण जसजसं ते धुकं कमी होत जात तसतसं आपल्याला भोवतालच्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. कोणा व्यक्तीच्या प्रेमात पडलं की अगदी तसंच काहीसं होत नाही का ? कधीही न भेटलेला व्यक्ती आपल्याला आवडायला लागतो आणि आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो. तिथून हळुवार फुलणार्‍या प्रेम कहाणीला सुरुवात होते. कधी लुकलुकत्या चांदण्यात तर कधी चंद्राच्या मंद प्रकाशात त्याचा हात हातात घेऊन आपण पुढच्या प्रवासाची स्वप्नं रंगवू लागतो. आपण त्या व्यक्तीच्या इतक्या प्रेमात पडलेलो असतो की, वास्तव्य समोर असून देखील आपण ते उघड्या डोळ्याने बघू शकत नाही किंवा दिसलं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यात त्या प्रेमाचा दोष नसतो. त्यात दोष असतो तो निव्वळ आपला ! नशिबाचा ! आपला जीव ज्या व्यक्तिवर जडला आहे तो खरंच त्या विश्वासाच्या पात्र आहे का ? ज्या व्यक्तीच्या नावावर आपण आपल संपूर्ण आयुष्य करू पाहतो आहे तो आपल्या प्रेमाच्या पात्रतेचा आहे का ? या सगळ्या शंका, प्रश्न त्याक्षणी निरर्थक वाटतात... कारण आपलं प्रेम असतं ना त्या व्यक्तीवर.

ते म्हणतात ना प्रेम एकदा तरी करून पहावे. पण हा विश्वास का एकदा तुटला की मग तो सगळा प्रवास एका मृगजळासारखा वाटू लागतो. असून नसल्यासारखं, डोळ्यांना दिसलं तरी समोर जाताच चकवा देणारं, दुरून अतिशय सुंदर तर जवळ गेल्यावर अस्तित्वात नसणारं. अशीच हळुवार प्रेमकहाणी सुरू होते आपल्या स्वाती आणि श्रीधरमध्ये पण यांच्या कथेला रहस्याची किनार आहे.

या कथेतील स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशीक, साधी सरळ. फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं असे तिचे म्हणणे आहे, आणि याचमुळे स्वभावाने चांगली असून देखील वयाच्या 34 व्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे. अशाच स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो. आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात.

प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. काहींना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, तर काहींची मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. पण, प्रेमाच्या या हळुवार, सुंदर नात्याभोवती जेव्हा विश्वासघाताचं कुंपण येतं तेव्हा माणसाची होरपळ सुरू होते. आपल्याच आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीकडून तो झाला आहे याचा जेव्हा संशय येतो तेव्हा कशी ती व्यक्ती स्वत:ला सांभाळते आणि पुढे जाते ? हा प्रश्न समोर येतो. या मालिकेतील स्वाती आणि श्रीधरची प्रेमकथा काहीशी अशीच आहे... कसा असेल यांचा प्रवास ? असं कोणतं रहस्य आहे ज्याने या दोघांचे आयुष्य बदलून जाणार आहे? या हळुवार प्रेम कहाणीची सुरुवात होणार आहे.

चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे. 11 नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री 8.30 वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.