आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मालिका:'जीव माझा गुंतला' लवकरच, अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मल्हार - अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची.

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी - सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो. अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. टेल-अ-टेल मीडियाची निर्मिती असलेली 'जीव माझा गुंतला' ही मालिका 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

काय आहे मालिकेची कथा
आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.

मालिकेचे लेखक जिंतेंद्र गुप्ता म्हणाले, “जगाभरातली कोणतीही लोकप्रिय कथा असो मग ते महाभारत असो किंवा कोणत्याही स्वरूपात लिहिली गेलेली कथा. प्रत्येक कथेला वेगळेपण त्या कथेतली पात्रं देतात. त्या पात्रांमुळे ती गोष्ट लोकांच्या स्मरणात राहते. कथेपेक्षा त्या कथेतील पात्रं लोकांच्या मनात घर निर्माण करतात. 'जीव माझा गुंतला' ही अशीच दोन वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाकांक्षी व्यक्तींची गोष्ट आहे. जे महत्वाकांक्षी तर आहेतच पण त्यासोबत आपल्या आसपासचे वाटावेत असे आहेत. कलर्स मराठीने यावेळेस वेगळी अशी कथा प्रेक्षकांना देण्याची संधी आम्हाला दिली आहे. या मालिकेचा लेखक आणि निर्माता म्हणून हे प्रचंड आव्हानात्मक काम आहे पण टेल-अ-टेल मिडीया, अशाच आव्हानात्मक कामांमध्ये यश मिळवणारी निर्मिती संस्था म्हणून ओळखली जाते. मालिकेसाठी नव्या कथा आणि त्यातली पात्रं हेच आमचं वैशिष्ट्य राहिलंय. तर आमच्या बाकीच्या लोकप्रिय असलेल्या आणि झालेल्या मालिकांसारखीच ही मालिकासुद्धा लोकप्रिय होईल आणि तुम्हाला आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे”.

दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर ? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार - अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...