आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन मालिकेच्या निमित्ताने:नृत्यांगना ते अभिनेत्री... ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकीविषयी अधिक जाणून घेऊया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'पिंकीचा विजय असो' ही नवी मालिका येत्या 17 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वहिनी नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. 17 जानेवारीपासून रात्री 11 वाजता स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका 'पिंकीचा विजय असो'. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिच्याशी केलेली ही खास बातचीत.

  • पिंकीचा विजय असो या मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील?

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचं अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.

  • पिंकी आणि शरयूमध्ये काही साम्य आहे का?

पिंकी आणि शरयूमध्ये अजिबात साम्य नाही. पिंकी बिनधास्त आहे. तिची अखंड बडबड सुरु असते. पिंकीच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधी असा माझा स्वभाव आहे. मी खूपच शांत आहे. त्यामुळे पिंकी साकारणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. पिंकीची बोलण्याची स्टाईल माझ्या इतकी अंगवळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्तही मी इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते.

  • तू मुळची मुंबईची, शूटिंग साताऱ्यामध्ये सुरु आहे. सेटवर कसं वातावरण असतं?

सेट हे माझं दुसरं घरच आहे. सहकलाकार आणि आमचे दिग्दर्शक मला खूप समजून घेतात. पिंकी हे पात्र उभं करण्यात आमच्या संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. माझ्या लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या हर्षद नायबळसोबत मी सेटवर खूप धमाल करते. त्याच्यावर ताईगिरी दाखवतानाच भावाच्या मायेने प्रेमही करते. त्यामुळे नव्या वर्षाने मला नवं कुटुंब दिलंय असंच म्हणायला हवं.

  • अभिनया व्यतिरिक्त तुझ्या काय आवडी-निवडी आहेत?

मला नृत्याची आवड आहे. मी भरत नाट्यम शिकले आहे. डान्सच्या निमित्ताने माझे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतात. मी ड्रीमगर्ल हेमामालिनी यांच्यासोबत यशोदा-कृष्ण बॅले करायचे ज्यात मी नृत्यामधून कृष्ण साकारला आहे. हा अनुभव थक्क करणारा आहे. माझी ही नृत्याची आवड मला पिंकी हे पात्र साकारताना देखील उपयोगी पडते आहे. डान्सचे अनेक सिक्वेन्स आम्ही मालिकेत शूट केले आहेत जे प्रेक्षकांना पहाताना नक्कीच मजा येईल.

बातम्या आणखी आहेत...