आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मालिका:‘सोन्याची पावलं’ नवी मालिका लवकरच, बघायला मिळणार भाग्यश्री - दुष्यंत यांची जगावेगळी प्रेमकथा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सोन्याची पावलं’ ही मालिका 5 जुलैपासून सोम. ते शनि. संध्या. 6.30 वाजता बघायला मिळणार आहे.

एखाद्या घरी मुलगी जन्माला आली असो किंवा मुलीने सासरी माप ओलांडून सून म्हणून गृहप्रवेश केला असो तर असं म्हणतात की, “सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली”. ही एक भाबडी समजूत असते किंवा आपला विश्वास असतो. नवी नवरी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीप्रमाणे घरात आली आणि सासरच्या अंगणात भरभराट झाली. सूनेच्या येण्याने कुटुंबावर ओढवलेलं मोठं संकट टळलं, तिच्या येण्याने विस्कटलेल्या कुटुंबाची घडी पुन्हा एकदा बसू लागली. अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात, काही घटना आपण प्रत्यक्ष बघत देखील असतो. काहींचा या गोष्टीवर विश्वास असतो, तर काहींचा नसतो. काही म्हणतात योगायोग आहे, तर काही म्हणतात प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे.

या कथेतील भाग्यश्रीची गोष्ट आणि तिचा प्रवास या सगळ्यांहून जरा वेगळा आहे असे म्हणावे लागेल. विधिलिखित कुणाला चुकत नाही, हे अगदी खरं. भाग्यश्रीच्या नशिबात इनामदारांची सून होणं लिहिलेलच होतं म्हणून तिची भेट दुष्यंतशी झाली आणि ते अपघाताने लग्नबंधनात अडकले. पण लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य पूर्णतः बदललं.

एका छोट्या गावामध्ये मध्यम वर्गीय घरात वाढलेली भाग्यश्री ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि मेहनती मुलगी आहे. इतरांना आनंद कसा देता येईल याच प्रयत्नात ती असते. ‘आपण आपलं काम करत राहावं, एक ना एक दिवस देव त्याचं फळ देईल’ हे भाग्यश्रीच्या जगण्याचे सूत्र आहे. भाग्यश्री दहा वर्षांची असताना तिची आई देवा घरी गेली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या जाचाला कंटाळलेल्या भाग्यश्रीला आता यातून सुटकेचा एकमेव मार्ग दिसतो आहे आणि तो म्हणजे लग्न. तर, दुसरीकडे इनामदार घराण्याचे शेंडेफळ दुष्यंत इनामदार. अत्यंत देखणा, धडाडीचा, इतरांना सल्ले देणारा, मित्रांच्या मदतीला एका हाकेवर धावणारा, लोकांना मदत करणारा. याच सवयीमुळे त्याची भाग्यश्रीशी ओळख होते आणि अपघाताने भाग्यश्री - दुष्यंतचं लग्न होतं.

नियतीमुळेच दोन वेगळी विश्व असलेले भाग्यश्री आणि दुष्यंत एकत्र येतात. मात्र इनामदारांच्या कुटुंबात सून म्हणून आलेल्या भाग्यश्रीला घरातील काही मंडळींच्या तिरस्काराला सामोरी जावे लागते. वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करून इनामदार घराण्याचा उद्धार करणं भाग्यश्रीला जमेल का ? इनामदार घराण्यातील वडीलोपार्जित सोन्याची पावलं याचं काय रहस्य आहे ? या पावलांच्या पुण्याईवर दुष्यंतचा मुळीच विश्वास नाहीये. भाग्यश्रीचे दैव आणि दुष्यंतचा त्यावरील अविश्वास यामध्ये कोण खरं ठरेल? हे मालिकेत बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...