आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कमी लोकसंख्या असलेल्या देशात आकाशपाताळ एक करूनही जेव्हा गुन्हेगार सापडत नाही तेव्हा त्या देशातील पोलिसांना मुंबई पोलिसांचे उदाहरण दिले जाते. 135 करोड लोकसंख्या असलेल्या देशात गुन्हेगार शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधणे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं.
महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलिसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका असेल
काही वर्षांपूर्वी लक्ष्य या मालिकेतून युनिट 8 टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांनी अनुभवली होती आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला होता. आता ‘नवे लक्ष्य’ हा मनोरंजनाच्या ठेव्यातील नवाकोरा अध्याय असेल. पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट ‘नवे लक्ष्य’मधून आपल्या भेटीला येईल. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट 9 ची टीम सज्ज झाली आहे.
आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. या मालिकेत सोहम पोलिसांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सोहमची ही पहिलीच मालिका आहे.
‘नवे लक्ष्य’ या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल.’
नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य नव्या रुपामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे याचा आनंद आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.