आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सत्तेच्या खुर्चीसाठी होणा-या राजकारणावर सामना, सिंहासनपासून ते अगदी अलीकडेच रिलीज झालेल्या धुरळापर्यंत अनेक मराठी सिनेमे आजवर झळकले. या सिनेमांनी सत्तेसाठी काहीही करणा-या राजकारण्यांमूळे कुटूंबावर आणि सामान्य माणसावर होणारा परिणाम दाखवला. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, ते आता पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमाव्दारे आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आराध्या मोशन फिल्म प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित स्वरूप वैशाली बाळासाहेब सावंत दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते सचिन दुबाले पाटील आहेत.
मोशन पोस्टरमधल्या लहान मुलाच्या दमदार आवाजाने ‘खुर्ची’ सिनेमात दिसणा-या राजकीय नाट्याचा अंदाज येतोय. ‘माझा बाप नेहमी म्हनतो, मानूस वयाने लहान असतो. पन स्वप्न बघायला वय नसतं. ते कोनत्या बी वयात पुर्न करू शकतो. आता खुर्ची आपलीच...’ या वाक्यातून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण खुर्चीमधून परिणामकारकपणे उमटणार हे नक्कीच दिसून येतंय.
सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असले तरी या चित्रपटात कोण कलाकार असतील, हे मात्र निर्मात्यांनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वरूप वैशाली बाळासाहेब सावंत आणि केशव कल्याणकर यांनी लिहीलेले आहेत. ‘बॅलेंस’ आणि ‘पॉस्को-307’ नंतर स्वरूपचा हा तिसरा सिनेमा आहे. स्वरूप सांगतो, “गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात मोठ्यांच्यासोबत नकळतपणे लहानही ओढले जातात. मग मोठ्यांचे राजकारणातले डावपेच कधी लहान मुलांच्या मनावर बिंबत जातात, ते त्यांनाही उमजत नाही. लहानपणीच शहकाटशहच्या या खेळाची मुळं मुलांच्या मनात खोल रूजत जातात. बुध्दीबळाच्या ह्या खेळाचा परिणाम झालेल्या गावातल्या एका मुलाची ही कथा आहे.”
चित्रपटाचे निर्माते संतोष वसंत हगवणे म्हणतात, “स्वरूपने लिहिलेली कथा मला खूप आवडली. त्यामुळे मी या सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले. सध्या चित्रपटाच्या संहितेवरचे काम पूर्ण झाले असून आता ऑक्टोबरपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल. आणि एप्रिल 2021 मध्ये आम्ही हा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येऊ. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु खुर्चीव्दारे आपल्याला पाहायला मिळणार आहे.”
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.