आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:एनएफएआयकडे मराठी चित्रपटांचा दुर्मिळ खजिना; पवनाकाठचा धोंडी, देव पावला, भाऊबीज अशा चित्रपटांचा समावेश

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १९५० ते १९७० या दोन दशकांच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९ चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील काही गाजलेल्या चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समृद्धीत नव्याने भर पडली आहे. १९५० ते १९७० या दोन दशकांच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९ चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. या सर्व चित्रपटांच्या फिल्म्स १६एमएम ते ३५ एमएम स्वरूपातील आहेत. विशेष म्हणजे या खजिन्यात ‘ताई तेलीण’ (१९५३), आणि ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९६६) या एकेकाळी ‘हरवल्या’ गेलेल्या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आर्यन फिल्म कंपनीने केली होती आणि त्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुंजारराव पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. पी. भावे आणि अंतो नरहरी यांनी केले होते तर संगीत मास्टर कृष्णराव यांनी दिले होते.

‘हरवली’ म्हणून आतापर्यंत समज असलेली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची फिल्मही मिळाली आहे. अनंत ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला १९६६ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला होता. अनंत ठाकूर यांनी ‘पवनाकाठचा धोंडी’ हा दिग्दर्शित केलेला पहिलाच मराठी चित्रपट होता. या दुर्मिळ चित्रपटांच्या खजिन्यात राम गबाले यांच्या ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटाचाही समावेश आहे. याशिवाय ‘भाऊबीज,’ माधव शिंदे यांचा ‘अंतरीचा दिवा,’ ‘सुभद्राहरण,’ ‘बारा वर्षे, सहा महिने तीन दिवस, राज दत्त यांचा ‘धाकटी बहीण,’ केशव तोरो यांचा ‘पुढारी,’ ‘बन्याबापू ,’ ‘दीड शहाणे,’ ‘राखणदार’ आणि कांचन नायक यांचा ‘कळत-नकळत’ आदींचा समावेश असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...