आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:'लाव रे तो व्हिडिओ' या शोमध्ये दुहेरी भूमिकेत झळकणार निलेश साबळे, सांगतोय - हा शो प्रेक्षकांनी का पाहावा?

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'लाव रे तो व्हिडिओ'मधून निलेश साबळे करणार टॅलेंट हंट...

'चला हवा येऊ द्या' या सुपरहिट कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे, 'झी युवा' वाहिनीवर 'लाव रे तो व्हिडिओ' हा असाच एक भन्नाट कार्यक्रम घेऊन येत आहेत. प्रेक्षकांचाथेट सहभाग असलेल्या या कार्यक्रमात, महाराष्ट्रातील अनोख्या टॅलेंटच्या मदतीने निलेश साबळे आपले मनोरंजन  करताना दिसेल.  या टॅलेंट हंटच्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा... 

 • 'लाव रे तो व्हिडिओ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'झी युवा'सोबत तू काम करणार आहे. याबद्दल काय सांगशील?

'झी मराठी'सोबत मी गेली दहा वर्षे काम करतो आहे. 'झी' ग्रुपमुळे, अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली. 'झी' हा माझा एक परिवार आहे. आज, 'लाव रे तो व्हिडिओ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने, 'झी युवा'सोबत काम करण्याची संधी मला मिळणार आहे. या वाहिनीसोबत युवावर्ग जोडला गेलेला आहे. त्या प्रेक्षकांसाठी आणि  या वाहिनीसोबत काम करण्याची माझी इच्छा होती. आज ही इच्छा पूर्ण झाली आहे. 

 • या कार्यक्रमाविषयी आम्हाला थोडंसं सांग.

कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, हे आपण अनेकवेळा पाहत आलो आहोत. पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकच प्रेक्षकांचं, खरंतर, सगळ्यांचंच मनोरंजन करतील. दोन मिनिटांमध्ये, जर तुम्ही कुणाचं, मनोरंजन करू शकत असाल, तर तुमचा व्हिडिओ शेअर करा. गायन, वादन, मिमिक्री किंवा इतर कुठलीही कला यात समाविष्ट असू शकते. अगदी रांगोळी काढण्याचा एखादा व्हिडिओसुद्धा मनोरंजन करणारा ठरू शकतो. यात सहभागी होण्याची संधी सगळ्यांनाच आहे. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात एक विजेता सुद्धा घोषित करण्यात येईल आणि त्याला रोख पारितोषिकसुद्धा  देण्यात येणार आहेत.

 •  'लाव रे तो व्हिडिओ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिभावान मंडळींचा शोध तुम्ही घेत आहात. यासाठी काय करावं लागतंय?

वाहिनीवर केवळ एक आवाहन करण्यात आलं, आणि हजारोंच्या संख्येने प्रतिसाद येऊ लागला. हे व्हिडिओ बघण्याचं मोठं काम आता सुरु झालं आहे. सगळेच व्हिडिओ उत्तम दर्जाचे असल्यामुळे, यातून चांगले व्हिडिओ शोधून काढणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान ठरणार आहे. 

 • यात तू आणि आणखी एक मिशीवाला, अशी दोन पात्रं आहात. ही नेमकी गम्मत काय आहे?

या कार्यक्रमात तुम्हाला सूत्रसंचालन आणि अभिनय करणारा एक निलेश साबळे, जो तुम्ही नेहमी टीव्हीवर पाहत आलाय तो दिसेल आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने तेवढच महत्वाच आहे आणि दुसरा जो मिशीवाला तुम्हाला दिसतो आहे तो सुद्धा आहे या कार्यक्रमात. आता तो नक्की काय करतोय या कार्यक्रमात हे त्यालाच विचारल तर बरं होईल (हसून).

 • तुझी सुरुवात एका टॅलेंट शोमधून झाली आहे. मग, हा टॅलेंट शो कलाकारांना नक्की काय मिळवून देईल असं तुम्हाला वाटतं?

'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमामुळे, मला एक उत्तम संधी मिळाली. मी माझी कला एका मोठ्या मंचावर सादर करू शकलो. म्हणूनच, मी आज इथे पोचू शकलो आहे. 'लाव रे तो विडिओ' हा नवाकोरा कार्यक्रम सुद्धा, अनेकांसाठी असाच एक मंच, अशीच एक संधी ठरू शकतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीनेच, 'झी'ची टीम, अनेक दिग्दर्शक सुद्धा हा कार्यक्रम पाहतील. त्यामुळे, या कार्यक्रमातील कलाकारांनी, येत्या काळात मालिका, चित्रपट इत्यादींमध्ये संधी मिळू शकते. कदाचित, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा सुद्धा तुम्ही भाग होऊ शकता. एक कलाकार म्हणून, अशी संधी निर्माण करण्यासाठी 'लाव रे तो विडिओ' या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हायला हवं.

 • आजवर तू प्रेक्षकांना केवळ 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय मालिकेतून दिसला. त्यानंतर आता या नव्या कार्यक्रमात दिसशील. याबद्दल काय सांगशील?

'चला हवा येऊ द्या' हा अतिशय लोकप्रिय झालेला कार्यक्रम आहे. आज लॉकडाऊनच्या काळात सुद्धा हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अर्थात, घरी बसून असल्यामुळे, प्रेक्षकांशी संवाद कसा साधता येईल, असा विचार मनात सुरू होताच. अशावेळी, 'झी युवा'सारख्या दर्जेदार वाहिनीवर, हा कार्यक्रम करण्याबद्दल मला विचारण्यात आलं. 'लाव रे तो विडिओ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांशी संवाद साधता येईल. माझं स्वतःचं सुद्धा खूप मनोरंजन होईल याची खात्री वाटली. याशिवाय, 'चला हवा येऊ द्या'प्रमाणे हा कार्यक्रम सुद्धा अत्यंत लोकप्रिय होईल असा विश्वास मला आहे. म्हणूनच, मी हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. 

 • 'चला हवा येऊ द्या'मधील टॅलेंट आणि 'लाव रे तो व्हिडिओ'मधील टॅलेंट या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे?

या दोन कार्यक्रमांमधील टॅलेंटमध्ये काहीच फरक नाही, असं मी म्हणेन. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील पात्रं, मी लोकांमधूनच शोधली आहेत. आणि 'लाव रे तो व्हिडिओ'च्या निमित्ताने लोकांमधून  ही पात्रं स्वतःहून पुढे येणार आहेत. 'चला हवा येऊ द्या'मध्ये काम करणारे कलाकार, हे आज स्टार झालेले आहेत, तर 'लाव रे तो व्हिडिओ'च्या निमित्ताने उद्याचे अनेक स्टार्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

 • या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार मंडळी सुद्धा असणार आहेत. त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे?

बरेच जण घरात बसून, मनोरंजन करणारा एखादा व्हिडिओ तयार करतात. असे व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवा, जे आम्ही टीव्हीवर दाखवणार आहोत. लॉकडाऊनच्या काळात सेलेब्रिटी सुद्धा घरी बसून आहेत. अशीच काही सेलिब्रिटी मंडळी या कार्यक्रमात सहभागी होतील. हे कलाकार, त्यांची एखादी वेगळी कला दाखवणारा व्हिडिओ पाठवतील, जो प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याशिवाय, प्रेक्षकांच्या व्हिडिओमधून एक विजेता व्हिडिओ निवडण्यात येईल. त्याची निवड करण्यासाठी एक सेलिब्रिटी जज असेल. व्हिडिओच्या माध्यमातून तेदेखील यात सहभागी होतील. प्रत्येक नव्या एपिसोडमध्ये एक नवा कलाकार सहभागी होईल.

 • हा शो प्रेक्षकांनी का पाहावा?

प्रेक्षकांना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा असेल. स्वतः टीव्हीवर दिसणार आहोत, अशी संधी प्रेक्षकांना सहसा मिळत नाही. मनोरंजन करण्याची संधी सुद्धा प्रेक्षकांना मिळेल. इतरांचे व्हिडिओ बघून, आपणही असा एखादा व्हिडिओ बनवावा अशी इच्छा सर्वच प्रेक्षकांना होईल. प्रेक्षकांना स्वतः सहभागी होता येईल, आणि भरपूर मनोरंजन सुद्धा होईल, असा वेगळा कार्यक्रम पाहता येईल, म्हणूनच 'लाव रे तो व्हिडिओ' अवश्य पहावा.

बातम्या आणखी आहेत...