आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मामां'ची लव्ह स्टोरी:अशोक यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा 6 वर्षांच्या होत्या निवेदिता, मुंबईऐवजी गोव्यात केले होते लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोक सराफ यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नाहीये.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 4 जून 1947 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशोक सराफ यांनी फिल्मी करिअरमध्ये अडीचेशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अगदी विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही ते रमले. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोक सराफ खासगी आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचे आहे. मीडियापासूनही ते कायम लांब राहतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नाहीये. आज मामांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी -

पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत अशोक सराफ

अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र अशोक सराफ त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल 18 वर्षांनी मोठे असल्याचे फार जणांना ठाऊक नसावे. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म 6 जून 1965 चा आहे. या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे.

...तेव्हा सहा वर्षांच्या होत्या निवेदिता

विशेष म्हणजे 1971 साली अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे होते. तर निवेदिता सराफ 1971 साली केवळ सहा वर्षांच्या होत्या.

निवेदिता यांच्या घरच्यांचा होता लग्नाला विरोध
अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट डार्लिंग डार्लिंग या नाटकाच्या वेळी झाली होती. ही माझी धाकटी मुलगी असे सांगत निवेदिता यांच्या वडिलांनी अशोक सराफ यांच्याशी त्यांची ओळख करुन दिली होती. पुढे नवरी मिळे नव-याला या चित्रपटाच्या सेटवर निवेदिता आणि अशोक सराफ यांच्यातू सूत जुळले. तर धुमधडाका या चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी फुलू लागली. त्यानंतर दोघांनी निर्णय घेतला. पण त्यांच्या लग्नाला निवेदिता यांच्या घरातून विरोध झाला. निवेदिता यांनी सिनेसृष्टीतील व्यक्तीशी लग्न करु नये, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतू निवेदिता त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर त्यांच्या घरच्यांचा विरोध मावळला आणि त्यांनी या लग्नाला परवानगी दिली. अशा प्रकारे निवेदिता या मिसेस निवेदिता अशोक सराफ झाल्या.

गोव्यात लग्न करण्यामागे होते खास कारण

निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध मंगेश मंदिरात झाले होते. गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून 7 कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. येथेच हे मंदिर आहे. यामागचे कारणही तसेच आहे. अशोक सराफ यांची गणपती आणि शंकरावर मोठी आस्था आहे. तर मंगेशी हे त्यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करण्याचा अशोक सराफ यांनी निर्णय घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...