आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या आणि मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. अभिनेत्रीसोबतच ती एक कवियित्रीदेखील आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा 'प्राजक्तप्रभा' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आता प्राजक्ताने व्यवसायतदेखील पाऊल ठेवले आहे. प्राजक्ताने नुकताच तिचा नवा ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केला आहे. या ब्रॅण्डचे नाव 'प्राजक्तराज' असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅण्डचे अनावरण करण्यात आले.
प्राजक्ताने सांगितले ब्रॅण्डच्या नावामागील गुपित
यावेळी प्राजक्ताने आपल्या ज्वेलरी ब्रॅण्डसाठी 'प्राजक्तराज' याच नावाची निवड का केली यामागील गुपित सांगितले. ती म्हणाली, "मला सगळ्यांनी या ज्वेलरी ब्रॅण्डचे नाव ‘प्राजक्तसाज’ असे सुचवले होते. पण ते नाव न निवडता मी ‘प्राजक्तराज’ हे नाव निवडले. ‘प्राजक्तसाज’ हे छान नाव आहे पण त्यावरून लगेच कळते की, हा दागिन्यांचा ब्रॅण्ड असेल. म्हणून मी हे नाव ठेवले नाही. तर ‘राज’ या शब्दात एक भारदस्तपणा आहे, या शब्दाला एक वजन आहे. कुठल्याही शब्दाला ‘राज’ जोडले की त्याचे वजन वाढते. एखादा देखणा मुलगा असेल तर त्याला आपण राजबिंडा असे म्हणतो. तसेच माझ्या दागिन्यांचेही आहे. म्हणून याला ‘प्राजक्तराज’ हे नाव दिले," असा खुलासा प्राजक्ताने यावेळी केला.
प्राजक्ताच्या या कृतीने वेधले सगळ्यांचे लक्ष
प्राजक्ताच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात या दोघांचाही सत्कार करण्यात आला. प्राजक्ताने राज यांचा सत्कार जिरेटोप देऊन केला तर तिने शर्मिला यांचा सत्कार तुळस देऊन केला. मात्र हे करत असताना तिने अशी एक गोष्ट केली जी पाहून नेटकरीही तिचे कौतुक करत आहेत. शर्मिला यांना तुळस भेट देताना प्राजक्ताने मंचाच्या एका बाजूला आधी पायातल्या चपला काढून ठेवल्या आणि मगच तिने ती तुळस देऊन त्यांचा सन्मान केला. तिने आपल्या एका कृतीतून तुळशीचं पावित्र्य राखले. हे बघून नेटकरीही तिचे कौतुक करत होते.
काय आहे 'प्राजक्तराज' दागिण्यांचे वैशिष्ट्य..
प्राजक्ताने आपल्या या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रॅण्डच्या माध्यमातून इतिहासकालीन दागिने पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आणले आहेत. या ब्रॅण्डमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपरिक दागिने म्हणजे सारा, बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार यासारखे अनेक दागिने मिळणार आहेत. मुख्य म्हणजे हे दागिने खरे नसून ते ऑथेंटिक असणार आहेत. म्हणजेच दुसऱ्या धातूवर सोन्याचे पाणी चढवलेले हे दागिने असणार आहेत. लग्नसमारंभासाठी किंवा सणावारासाठी परिधान करायचे महाराष्ट्राच्या मातीतले हे दागिने प्राजक्ताने आपल्या ब्रॅण्डच्या रूपाने समोर आणले आहेत. या दागिन्यांच्या सोने, चांदी आणि तांब्याच्या दागिन्यांच्या शृंखलेची नावे तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा आहेत. यासोबतच पुरुषांसाठीही दागिने प्राजक्तराज लवकरच आणणार आहेत. या दागिन्यांच्या शृंखलेची नावे शिवबा, बळीबा आणि रायबा अशी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.