आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:'डॉक्टर डॉक्टर'मधील व्यक्तिरेखा अभिनयाचा कस लावणारी, नव्या चित्रपटाबद्दल सांगतोय प्रथमेश परब

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 ऑक्टोबर रोजी 'डॅाक्टर डॅाक्टर' हा पहिला मराठी सिनेमा 'झीप्लेक्स'वर प्रदर्शित झाला आहे.

अनलॅाक सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना नवनवीन सिनेमे पाहण्याचे वेध लागले आहेत. प्रेक्षकांची हीच आवड ओळखून मराठी सिनेसृष्टीसुद्धा नवनवीन माध्यमांकडे वळली आहे. 30 ऑक्टोबर रोजी 'डॅाक्टर डॅाक्टर' हा पहिला मराठी सिनेमा 'झीप्लेक्स'वर प्रदर्शित झाला आहे. किरण काशिनाथ कुमावत, गौरी सागर पाठक, सूरज दगडे-पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रितम पाटील यांनी केलं असून, प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांची अफलातून केमिस्ट्री यात अनुभवायला मिळेल. या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमेशशी केलेली ही बातचीत.

  • तू आणि पार्थ ने प्रथमच एकत्र काम केलं त्याबद्दल काय सांगशील?

'किल्ला' सिनेमाच्या प्रिमीयरच्या वेळी माझी आणि पार्थची पहिली भेट झाली होती. त्याचं काम मला खूप आवडलं होतं. भविष्यात कधीतरी आपण दोघांनी एकत्र काम करूया असं मी तेव्हा त्याला म्हटलं होतं. 'डॅाक्टर डॅाक्टर'च्या निमित्ताने तो योग जुळून आला. पार्थसोबत काम करताना एका तगड्या अभिनेत्यासोबत काम केल्याचं समाधान लाभलं.

  • तुझ्या भूमिकेबद्दल आणि तुमच्या टयूनिंग बद्दल काय सांगशील?

होय, खरोखर ही एक धमाल जोडी असल्याचा अनुभव प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर येईल. कारण यापूर्वी मी साकारलेल्या ज्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या, त्या केवळ उडाणटप्पू स्टाईलच्या होत्या, पण यात मी साकारलेला केशव हा अभ्यासात हुषार आहे. सिनेमात पुष्कर आणि केशवची गट्टी जमल्याने बरेच किस्से घडतात जे पोट धरून हसायला लावतील.

  • चित्रपटातील गाणी गाजतायेत त्याबद्दल काय सांगशील?

या सिनेमातील गाणी कथानकाला अनुसरून आहेत. यातील 'यारी ही...' हे माझं फेव्हरेट साँग आहे. हे गाणं आमच्या फ्रेंडशिपवर आधारलेलं आहे. यात प्रेक्षकांना आमचा ब्रोमांस पहायला मिळेल. 'माझाच पाहिजे...' हे कमर्शियल साँग असून, खूप चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलं आहे. हे गाणं जेव्हा पहिल्यांता ऐकलं, तेव्हा मला नाचावंसंही वाटलं आणि धमाल करावीशीही वाटली. लॅाकडाऊननंतर हे गाणं शूट करताना आम्हाला बरीच रिस्ट्रीक्शन्स होती, तरीही सर्वजण हे गाणं एन्जॅाय करत होते.

  • सेटवरचे किस्से सांगा?

पार्थ आणि माझी केमिस्ट्री पाहून सेटवरच्या फोकस पुलर यांनी आम्हाला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपमा देत तुम्हाला एकत्र काम करताना पाहून त्यांची आठवण येते असं म्हटलं होतं. ती आमच्यासाठी खूप मोठी कॅाम्प्लिमेंट होती. पुण्यात शूट सुरू असताना पार्थ अचानक मधेच कुठेतरी गायब व्हायचा आणि अर्ध्या-पाऊण तासानंतर पुन्हा हजर व्हायचा. तो नेमका कुठे जायचा हे कोडं कोणालाच उलगडलं नाही...

  • चित्रपटात तुझा एक वेगळा अंदाज आहे त्याबद्दल सांग?

स्त्री वेष धारण करणं वाटतं तितकं सोपं नाही. खूप मोठी जबाबदारी असते. स्त्री व्यक्तिरेखा साकारताना त्यात नेटकेपणा असणं खूप महत्त्वाचं असतं. हिलवाली सँडल, मुलींचे कपडे, सर्व अॅक्सेसरीज आणि हातात पर्स घेऊन काम करताना व्यक्तिरेखेची देहबोली आणि अभिनय यांचा अचूक बॅलेन्स साधावा लागतो. त्यामुळेच आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा अभिनयाचा कस लावणारी असल्याचं मला वाटतं.