आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या अभिनयाने सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये अधिराज्य गाजवणारे प्रख्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा शंतनू मोघे आणि सून प्रिया मराठे असा परिवार आहे.
श्रीकांत मोघे यांच्या आठवणीत त्यांची सून आणि अभिनेत्री प्रिया मराठेने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सासरे फक्त म्हणायला, तो मला बाबापेक्षाही जवळचा... अशा शब्दांत प्रियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय लिहिलंय प्रियाने तिच्या पोस्टमध्ये?
माझा बाबा! इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. "सासरे " फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. 'माझं पीयूडं;,'माझं लाडकं' अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की 'आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे ' असे सगळे प्रश्न विचारायचा. बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं. गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पहिला. मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे, हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिंवत राहील.'
गेले काही महिने श्रीकांत मोघे आजारी होते. मोघे यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला. पुणे व मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शन केले. तसेच लग्नाची बेडी, अंमलदार अशा नाटकांचेही प्रयोग केले. त्यांनी 60 हून अधिक नाटके आणि 50 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. श्रीकांत मोघे यांनी आपल्या कारकीर्दीवर ‘नटरंगी रंगलो,’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.