आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचिव्हमेंट:‘पुगळ्या’ मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सन्मान, मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड केला नावी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील 19 चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे.

‘पुगळ्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा (Moscow International Film Festival 2021) बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे नाव शिरोपेचात रोवले गेले आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 45 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन या सन्मानाबद्दल माहिती दिली आहे.

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात की, ‘या मराठी चित्रपटाच्या कथेला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जिंकणे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूपच अभिमानास्पद आहे’.

खरं तर एका शॉर्ट फिल्म साठी डॉ. सुनिल खराडे यांनी ‘पुगळ्या’ ही पटकथा लिहिली होती. मात्र, कथा लिहिल्यानंतर त्यांना या कथेवर चांगला चित्रपट होऊ शकतो, असे त्यांच्या मनात विचार आले आणि त्यांनी चित्रपट काढला.

निर्माते म्हणतात की, ‘हा चित्रपट मुलांच्या आणि कुत्र्याच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांचे वय 10 वर्ष आहे. यामध्ये वृषभ आणि दत्ता ही दोन मुले दाखवण्यात आली असून यातील वृषभ हा शहरी भागातला आहे तर दत्ता हा ग्रामीण भागातला असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे दोघेही एकमेकांना कधीच भेटलेले नाहीत. पण, या दोघांना पण कुत्रा पाळण्याची खूप इच्छा असते. त्यातच वृषभला कुत्रा भेट म्हणून मिळतो. मात्र, एक दिवस वृषभकडून तो कुत्रा हरवतो आणि तोच कुत्रा दत्ताला सापडतो’, अशी ही कथा आहे’.

लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील 19 चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. तसेच कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रीमिअर फिल्म अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पुगळ्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

बातम्या आणखी आहेत...