आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी दीर्घ आजाराने लतादीदींनी जगाचा निरोप घेतला होता. आजही दीदींच्या असंख्य आठवणींनी चाहते भावूक होतात. लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या लतादीदींची आजही तितकीच लोकप्रिय आहेत. लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले आहे. राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे फार घट्ट नाते होते.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
ट्वीटवर एक पोस्ट शेअर करत "...लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन" असे ते म्हणाले आहेत. त्यांनी दीदींचा एक फोटो शेअर करत लिहिले, "दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झाले. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार."
"माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील."
"चिरंजीवी होणे म्हणजे काय असे मला विचारले तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
लतादीदींनी वयाच्या 13 व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1942 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमधील पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली. लता मंगेशकर यांना 1969 मध्ये पद्मभूषण, 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
8 जानेवारी 2022 पासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना आणि न्यूमोनिया यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. मात्र, नंतर त्यांची प्रकृती खालावली आणि अनेक अवयव निकामी झाले. अखेर 6 फेब्रुवारीला सकाळी 8.12 वाजता त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.