आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कौतुकाची थाप:तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' लोकांच्या चेह-यावर हास्य आणेल...  भरत जाधव-केदार शिंदेच्या नव्या मालिकेसाठी राज ठाकरे उत्सुक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उत्सुक असल्याचे दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेविषयीची उत्सुकता ताणून धरली होती. शुक्रवारी त्यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध झाला आणि सुखी माणसाचा सदरामधून अभिनेता भरत जाधव छोट्या पडद्यावर झळकणार असल्याचे कळले. त्यानंतर या मालिकेविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली.

या मालिकेविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उत्सुक असल्याचे दिसत आहे. आज त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन केदार शिंदे आणि भरत जाधव यांना मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले, 'कोरोनाचे सावट आणि त्यामुळे आलेले आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असे मनापासून वाटते.' असे ते म्हणाले आहेत.

तर दुस-या ट्विटमध्ये त्यांनी भरत जाधवला ब-याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेले पाहून छान वाटले, असे म्हटले आहे. त्यांनी लिहिले, 'भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल...'

पुढे ते म्हणाले, ''...आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल हे केदार,भरत तुम्ही नक्की पहा. बाकी तुम्हा दोघांना आणि तुमच्या टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा.''

ही नवीन मालिका येत्या 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.