आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर सिनेसृष्टीत आले असते राज ठाकरे:फिल्म मेकिंग होते पॅशन, म्हणाले - ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणतेही बंधन असता कामा नये

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत 'अथांग' या आगामी मराठी वेब सिरीजच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. माझे पहिले पॅशन हे फिल्म मेकिंग आहे, अपघाताने मी राजकारणात आलो, असा उलगडा यावेळी राज ठाकरे यांनी केला.

चित्रपट की वेब सिरीज काय आवडते?
यावेळी राज ठाकरे यांना चित्रपट पाहायला आवडतो की वेब सिरीज असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मी पूर्णपणे सिनेमा प्रेमी आहे. मला सिरीज बघायला फारसे आवडत नाही. कारण कोणतीही गोष्ट दोन ते तीन तासात सांगून मोकळे व्हावे. कथा रेंगाळत ठेवणे मला फारसे आवडत नाही, असे राज ठाकेर म्हणाले.

फिल्ममेकिंग पहिले पॅशन
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी ते अपघाताने राजकारणात आल्याचे सांगितले. ते म्हणाले, फिल्ममेकिंग हे माझे पॅशन आहे, माझ्या घरात एक ड्रोबो मशीन आहे, त्यात एकूण नऊ ते साडे नऊ हजार चित्रपट आहेत, ते सर्व मी पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे तेजस्विनीने या कार्यक्रमात राज ठाकरेंना फिल्म मेकिंगबाबत देखील प्रश्न विचारला. तुम्ही सांगितले, की फिल्म मेकिंग हे तुमचे पहिले पॅशन आहे. तर तुम्ही आगामी काळात कोणत्या फिल्म मेकिंग किंवा दिग्दर्शन करताना आम्हाला दिसणार आहात?, या प्रश्नाला उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, 'राजकारण आणि चित्रपट या मोठ्या गोष्टी आहेत. निवडणुका हा एक धंदा आहे आणि हा कधी संपतच नाही. त्यामुळे याविषयाकडे लक्ष द्यायला जर वेळ मिळाला तर नक्की मी चित्रपटाची निर्मिती करेन, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणतेही बंधन असता कामा नये
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉरशिपबद्दल तुमचे काय मत आहे? असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, 'तुम्ही सिरीजमध्ये नेमके काय दाखवणार आहात? आणि त्या सीनसोबत त्याचा काय संबंध आहे,. मध्यंतरी मी एक वेब सिरीज बघत होतो. त्यात व्याकरणापुरते मराठी होते. बाकी सगळ्या शिव्या होत्या. त्या सिरीजची ती गरज असेल तर कोणतीही बंधन असताना कामा नये.'

प्लॅनेट मराठीच्या 'अथांग' या मराठी वेब सिरीजमध्ये निवेदिता जोशी सराफ, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, भाग्यश्री मिलिंद, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका शापित कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक तरल प्रेमकथाही पाहायला मिळेल. 'अथांग' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...