आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शेवंता'ची एक्झिट:'नवखे आणि ज्येष्ठ कलाकार माझ्या वाढलेल्या वजनावर माझी खिल्ली उडवायचे', अपूर्वा नेमळेकरने सांगितली मालिका सोडण्यामागची अनेक कारणे

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपूर्वाने सोशल मीडियावर तीन पोस्ट शेअर करत यामागची कारणे सांगितली आहे.

छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले 3' या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळतोय. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच तिसऱ्या पर्वावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण सध्या मालिकेत शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मालिकेत सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकर ही शेवंताची भूमिका साकारणार आहे. पुर्वी ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत होती. अचानक अपूर्वाने ही मालिका का सोडली असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आता स्वतः अपूर्वाने सोशल मीडियावर तीन पोस्ट शेअर करत यामागची कारणे सांगितली आहे. मी शेवंताच्या भूमिकेचा त्याग का केला? या प्रश्नाचे उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. या गोष्टीचा उलगडा करणे हे माझे कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे, असे अपूर्वाने म्हटले आहे. शेवंताच्या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवले होते, पण माझ्या वाढलेल्या वजनावर नवखे आणि ज्येष्ठ कलाकार माझे विडंबन करायचे, असा खुलासा अपूर्वाने केला आहे. इतकेच नाही तर या मालिकेसह आणखी एक मालिका देणार असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले होते, पण अद्याप तो शब्द पाळला गेला नसल्याचेही ती म्हणाली आहे.

आपल्या पहिल्या पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले, ‘शेवंता’, बस नाम ही काफी है, पर कभी कभी ये इतनाही काफी नही होता.... शेवंता’ म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर ‘शेवंता’चे सादरीकरण हे मला सहज जमत गेले. जणू काही मीच ती ‘शेवंता’ अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य, त्या व्यक्तिरेखेतील विविध पैल, निर-निराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘शेवंता’ ही अजरामर झाली. ‘शेवंता’ची भूमिका मला खूप काही देऊन गेली.'

'असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी ‘शेवंता’च्या भूमिकेचा त्याग का केला? असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत, ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याच उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. या गोष्टीचा उलगडा करणे हे माझे कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.'

पुढे ती सांगते, 'शेवंता’ या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवले होते. वजन वाढल्यावर ज्या काही नेगिटिव्ह कमेंट्स आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी त्यावर कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.'

'तुम्हाला माहितीच आहे की ‘रात्रीस खेळ चालेचं शुटिंग हे सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईवरुन 12 तासांचा ट्रेनने प्रवास करुन जात होते. मला शुटिंग करता बोलवल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करुन नंतर 3-4 दिवस काहीच शूट केलं जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ 6 ते 7 दिवसच काम लागत होतं आणि त्याकरिता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.'

'प्रोडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी आम्हाला तुमचे 5 ते 6 दिवसच लागणार आहे. म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु 5 ते 6 महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे.'

'असाच प्रकार गेल्यावर्षी ‘झी युवा’वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही,असं आश्वासन दिले गेले होतं. अद्याप पर्यंत तो चेक मिळाला नाही आणि ते आश्वासनसुद्धा पाळलं गेलं नाही.'

'मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल, माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथे होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला.'

'या पार्श्वभूमीवर, माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतातून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबले नाही. आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहिन आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे.' -अपूर्वा नेमळेकर

बातम्या आणखी आहेत...